इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी सामना केप टाऊन येथे सुरू आहे. सामन्याच्या अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 312 धावा करायच्या आहेत आणि त्यांचे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत. मैदानावरील ही चुरस सुरू असताना स्टेडियमवरील चाहत्यांमध्ये हास्यकल्लोळ उडाला. संघाबाहेर असलेल्या इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोवर कॅमेरामननं पिक्चरच तयार केला. त्यावरून लोकांना हसू आवरले नाही आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल होत आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील 269 धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेनं 223 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने दुसरा डाव 8 बाद 391 धावांवर घोषित करून 438 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात डॉम सिब्ली यानं 133 धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. त्याला बेन स्टोक्स ( 72) आणि कर्णधार जो रूट ( 61) यांनी अर्धशतकी खेळी करून चांगली साथ दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर आफ्रिकेनं 2 बाद 126 धावा केल्या आहेत. पीटर मलान 63 धावांवर खेळत आहे.