Join us  

चेंडू आदळल्यावर कोसळला, पण हिमतीनं उभा राहिला; पाहा अंगावर शहारे आणणारा Video!

गोलंदाज आणि फलंदाज यांच्यातीत ठस्सन अजूनही कायम आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 12:01 PM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक अपघात झालेल्याचा इतिहास आहे. काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. ताजे उदाहरण द्यायचे तर ऑस्ट्रेलियाचा प्रतिभावान खेळाडू फिल ह्यूज याना चेंडू आदळल्यानं प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर फलंदाजाच्या सुरक्षेसाठी अनेक उपकरणं आली आणि नियमही आले. पण, गोलंदाज आणि फलंदाज यांच्यातीत ठस्सन अजूनही कायम आहे. गतवर्षी झालेल्या अ‍ॅशेस मालिकेत असेच द्वंद्व पाहायला मिळाले. इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यांच्यातील त्या युद्धात स्मिथनं बाजी मारली. पण, एक सामना असा झाला जेथे सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला होता. 

क्रिकेटची पंढली लॉर्ड्स मैदानावर झालेल्या या सामन्यात आर्चर आणि स्मिथ यांच्यात चांगली चुरस पाहायला मिळाली. प्रथमच कसोटी संघात खेळण्याची संधी मिळालेल्या आर्चरनं ऑसी फलंदाजांना बाऊंसरचा मारा करून हैराण केले होते. एक वर्षाच्या बंदीनंतर मैदानावर परतलेल्या स्मिथला प्रेक्षकांचा हुटींगचाही सामना करावा लागत होता. त्यात मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मिथनं दोन्ही डावांत शतक ( 144 व 142) झळकावून इंग्लिश चाहत्यांना चिथावले होतेच. त्यामुळे लॉर्ड्सवर घमासान होणार हे निश्चित होते. 

या सामन्यात स्मिथ आणखी एक मोठी खेळी करण्यासाठी सज्ज होता. पण, यावेळी त्याला आर्चरच्या वेगवान माऱ्याचा सामना करावा लागणार होता. या सामन्यापूर्वी आर्चरनं स्मिथला आव्हानही दिलं होतं. पण, स्मिथनं नेहमीप्रमाणे आपल्या कामगिरीनं त्याला उत्तर देणं महत्त्वाचं मानलं. खेळपट्टीवर तंबू रोवून बसलेल्या स्मिथवर आर्चरनं बाऊंसरचा मारा सुरू केला. पहिल्या माऱ्यात चेंडू स्मिथच्या कोपऱ्यावर लागला.

तात्पुरते उपचार घेत स्मिथ पुन्हा सामना करण्यासाठी उभा राहिला. पण, आर्चरच्या एका बाऊंसरवर स्मिथ जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तातडीनं ड्रेसिंग रुममध्ये नेण्यात आले. तेव्हा तो 80 धावांवर होता.

त्यानंतर ऑसींची डाव गडगडताना पाहून दुखापतग्रस्त स्मिथ पुन्हा मैदानावर आला. आतापर्यंत हुटींग करणारे प्रेक्षकही त्याच्यासाठी टाळ्या वाजवू लागले होते. जखमी वाघासारखा स्मिथ खेळपट्टीवर लढला. त्यानं 161 चेंडूंचा सामना करताना 14 चौकारांसह 92 धावा करत इंग्लंडला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. स्मिथची ती दुखापत आणि त्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांच्या मनात चटकन आलेली भीती. याचा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियानं पोस्ट केला आहे. यामागची विस्तारीत गोस्ट लवकरच क्रिकेटप्रेमींसाठी येणार आहे.

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :अ‍ॅशेस 2019आॅस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथइंग्लंड