Join us  

रोहित शर्मानं 2023च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करावे, माजी सलामीवीराची इच्छा

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. न्यूझीलंडने 18 धावांनी विजय मिळवून सलग दुसऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 11:43 AM

Open in App

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. न्यूझीलंडने 18 धावांनी विजय मिळवून सलग दुसऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. संघ निवडताना केलेल्या चुका भारतीय संघाला महागात पडल्या आणि जेतेपदाचे प्रबळ दावेदार स्पर्धेबाहेर गेले. भारताच्या या पराभवानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची ही सुवर्णसंधी होती, परंतु त्यांना अपयश आले.  

मर्यादित षटकांच्या सामन्यात कोहलीचे नेतृत्व नेहमीच चर्चेत राहिले आहे. तो अनेकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर अवलंबून असल्याचे दिसले आहे. शिवाय त्याचे अनेक निर्णय चुकलेही आहेत. वर्ल्ड कपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास उपांत्य फेरीच्या सामन्यात धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय किती महागात पडला हे सर्वांनीच पाहिले. शिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या त्या सामन्यात मोहम्मद शमीला बसवण्याच्या निर्णयावरही टीका झाली.

अशा अनेक निर्णयामुळे कोहलीनं कर्णधारपदावरून पायउतार व्हावे अशी मागणी होत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळेच आता 2023मध्ये भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत यजमान संघाने नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात यावे, अशी इच्छा भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफरनं व्यक्त केली आहे. त्यानं ट्विट केलं की,''मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्याची वेळ आली आहे का? त्याला 2023च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना पाहायला आवडेल.''  भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले असले तरी रोहित शर्मानं ही स्पर्धा गाजवली. त्यानं 9 सामन्यांत 5 शतकांसह 648 धावा केल्या आहेत आणि स्पर्धेतील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. इंग्लंडचा जो रूट ( 549) धावांसह चौथ्या स्थानावर आहे. त्याला रोहितचा विक्रम मोडण्यासाठी आज शतकी खेळी करावी लागेल. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावावर असलेला वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडण्यात रोहित अपयशी ठरला.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019रोहित शर्माविराट कोहलीभारतन्यूझीलंड