सिडनी : खराब परिस्थितीचा सामना करीत असलेल्या आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघाची मदत करण्यास आपण तयार असल्याचे महान फिरकीपटू शेन वॉर्न याने म्हटले आहे. माझ्यासह अन्य माजी खेळाडूंची क्रिकेट आॅस्टेÑलियाने (सीए) सेवा घ्यावी, असे आवाहनही त्याने केले.
मार्च महिन्यात चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणानंतर आॅस्ट्रेलियाला अनेक पराभवांचा सामना करावा लागला. या प्रकरणाचा समीक्षा अहवाल आल्यानंतर सीएच्या अनेक अधिकाऱ्यांना पद सोडावे लागले होते. कुठल्याही स्थितीत विजय मिळविण्याचा आग्रह असल्यामुळेच खेळाडू अशा धोकादायक वळणावर पोहोचल्याचा निष्कर्ष अहवालात मांडण्यात आला आहे.
वॉर्न म्हणाला,‘ डोनाल्ड ट्रम्प यांच्या शब्दात सांगायचे तर ‘ चला क्रिकेटला पुन्हा महान बनवू या...’ क्रिकेट आॅस्ट्रेलिया खराब अवस्थेत आहे. खेळाडू मार्ग भटकलेले दिसतात. ‘सीए’ला योग्य वळणावर आणावे लागेल. मी या कामात मदत करण्यास तयार आहे. अन्य माजी खेळाडूंचादेखील असाच विचार असावा. ग्लेन मॅक्ग्रा आणि अन्य दिग्गजांना विचारणा केली जाऊ शकेल.’ (वृत्तसंस्था)