Virender Sehwag son Aryavir Batting: भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा आपल्या आक्रमक फलंदाजी शैलीमुळे ओळखला जायचा. तो फलंदाजीला आला की गोलंदाजांना धडकी भरायची. त्याचा हाच आक्रमकपणा आता त्याच्या मुलानेही क्रिकेटच्या मैदानात दाखवून दिला आहे. सेहवागचा मुलगा आर्यवीर नुकताच एका सामन्यातील दमदार खेळीमुळे चर्चेत आला आहे. आर्यवीर सेहवागने कूचबिहार ट्रॉफीमध्ये मेघालय विरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली आहे. दिल्लीकडून खेळताना त्याने या सामन्यात ५४ चौकार-षटकारांच्या सहाय्याने एकूण २९७ धावा कुटल्या.
आर्यवीरने गोलंदाजांना धू धू धुतलं...
आर्यवीरने कूचबिहार ट्रॉफीमध्ये अत्यंत स्फोटक फलंदाजी केली. त्याने मेघालय संघाच्या गोलंदाजांना अक्षरश: सळो की पळो करून सोडले. आर्यवीरच्या फलंदाजीत वीरेंद्र सेहवागची स्फोटक शैली स्पष्टपणे दिसून आली. आर्यवीर सेहवागने कूचबिहार ट्रॉफीमध्ये ३०९ चेंडूंचा सामना करत २९७ धावा केल्या. त्याने आपली खेळी ५१ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने फुलवली. आर्यवीरच्या या खेळीमुळे दिल्लीने मेघालयविरुद्ध ५ बळींच्या मोबदल्यात ६२३ धावा करून डाव घोषित केला.
वीरेंद्र सेहवाग म्हणाला- फेरारी २३ धावांनी हुकली!
वीरेंद्र सेहवागनेही मुलगा आर्यवीरच्या या खेळीचे कौतुक केले. आपल्या ट्विटर हँडलवर त्याने आपल्या मुलाच्या चमकदार खेळीचे कौतुक केले. तसेच फेरारी २३ धावांनी विजय हुकल्याचेही लिहिले. सेहवागने आपल्या मुलाला एक ऑफर दिली होती. जर आर्यवरीरने कुठल्याही क्रिकेट प्रकारात वीरेंद्र सेहवागचा ३१९ धावांचा विक्रम मोडला तर तो त्याची जुनी फेरारी कार मुलाला भेट देईल.
पाकिस्तान विरुद्धच्या मुलतान कसोटीत सेहवागने ३१९ धावा केल्या होत्या. आर्यवीर मेघालयविरुद्ध खेळताना त्या विक्रमाच्या अगदी जवळ होता. मात्र हा विक्रम मोडण्यासाठी त्याला २३ कमी पडल्या. त्यामुळे यावेळी त्याची फेरारी जिंकण्याची संधी हातून निसटली. पण त्याचा फलंदाजीचा फॉर्म पाहता तो लवकरच ही फेरारी कार मिळवेल अशी सेहवागलाही आशा आहे.