Join us

IPL 2023: "तुम्हाला असे प्रश्न विचारण्याची गरजच काय...?"; धोनीच्या मुद्द्यावरून वीरेंद्र सेहवाग भडकला

MS Dhoni Virender Sehwag: धोनीला गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने एक प्रश्न केला जातोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 13:40 IST

Open in App

MS Dhoni Retirement, Virender Sehwag: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने एमएस धोनीला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023 नंतर क्रिकेटमधून संभाव्य निवृत्तीबद्दल वारंवार विचारले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. धोनीला समालोचक डॅनी मॉरिसन यांनी LSG विरुद्धच्या सामन्यापूर्वी हा शेवटचा हंगाम आहे का? असे विचारले. परंतु चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराने चतुराईने, 'आता तुम्हीच मला सांगून टाकत आहात का..' असं म्हणत प्रश्नाच्या उत्तरालाच बगल दिली. या घडलेल्या प्रकारावर सेहवाग चांगलाच वैतागला आणि त्याने आपलं सडेतोड मत मांडलं.

सेहवाग म्हणाला की, जरी हे त्याचे शेवटचे वर्ष असले तरी धोनीला अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे सतत द्यावी लागू नयेत. योग्य वेळ आल्यावर तो आपल्या निर्णयाबद्दल लोकांना कळवेल. मला समजत नाही, ते लोक का विचारतात? त्याचे शेवटचे वर्ष असले तरी खेळाडूला विचारायचे का? तो त्याचा कॉल आहे, तो त्याला घेऊ दे! कदाचित लोकांना धोनीकडून हे उत्तर मिळवायचे असेल, की तो त्याचा शेवटचा हंगाम आहे का. पण हे त्याचे शेवटचे वर्ष आहे की नाही हे फक्त महेंद्रसिंग धोनीलाच माहीत आहे, तुम्हाला असले प्रश्न विचारायची गरजच काय?” अशा शब्दांत सेहवागने समालोचकावरच राग व्यक्त केला.

दरम्यान, लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांना बुधवारी पावसामुळे १-१ गुण विभागून द्यावा लागला. इंडियन प्रीमियर लीगचा हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने गुण विभाजित करावे लागले. एकाना स्टेडियमवर संततधार पावसामुळे, खेळात व्यत्यय आला तेव्हा लखनौ संघाने 19.2 षटकांत 7 बाद 125 धावा केल्या होत्या. सामन्याचा निकाल लावण्यासाठी दोन्ही संघांनी किमान पाच षटके खेळणे अपेक्षित असते. पण CSKच्या डावातील किमान पाच षटकेही खेळणं शक्यच झाले नाही. त्यामुळे सामना रद्द करावा लागला.

LSGच्या मधल्या फळीतील फलंदाज आयुष बडोनीने शानदार अर्धशतक ठोकले. त्याने ३३ चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. त्यात दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. चेन्नई सुपर किंग्जचे मोईन अली (2/13) आणि महेश तिक्षणा (2/37) यांनी गोलंदाजीत आपल्या प्रभाव दाखवून दिला. ओल्या आउटफिल्डमुळे 15 मिनिटांच्या विलंबानंतर खेळ सुरू झाला आणि पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकात पावसानेच पुन्हा सामना थांबला.

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीविरेंद्र सेहवागचेन्नई सुपर किंग्स
Open in App