Join us  

विराटसेनेचा 'पॉवर पंच', श्रीलंकेवर सहा विकेटने दणदणीत विजय

जसप्रीत बुमराहचे पाच बळी आणि रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा सहा गड्यांनी दणदणीत पराभव केला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 10:22 PM

Open in App

पल्लिकल, दि. 27 -  जसप्रीत बुमराहचे पाच बळी आणि रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा सहा गड्यांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह पाच एकदिवसीय सामन्याची मालिका भारताने 3-0 नं खिशात घातली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा सलग पाचवा एकदिवसीय मालिका विजय आहे. 2016 पासून झिम्बाब्वेचा 3-0, न्यूझीलंड 3-2, इंग्लंड 2-1 आणि वेस्ट इंडिजचा 3-1नं पराभव केला. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताबाहेरील हा तिसरा एकदिवसीय मालिका विजय आहे. कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेत भारताने श्रीलंकेला लोळवलं. 2019 च्या विश्वचषकात प्रवेश मिळवण्यासाठी या मालिकेतील दोन सामने श्रीलंकेला जिंकायचे आहेत. पण श्रीलंकेची सद्याची स्थिती पाहता ते अशक्य दिसतेय. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील श्रीलंकेचा पराभव पाहून सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षकही नाराज झाले होते. त्यांनी मैदानावर बाटल्या फेकत आपला राग व्यक्त केला. भारताला विजयासाठी 8 धावांची गरज असताना हा सर्व प्रकार घडला. प्रेक्षकांनी घातलेल्या गोंधळामुळे सामना अर्धा तास थांबवावा लागला. त्यानंतर प्रेक्षकांना मैदानातून बाहेर काढले गेले आणि सामना पुन्हा सुरु केला गेला. 

श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत दिलेल्या 218 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला सलामीवीर शिखर धवनला लसिथ मलिंगाने माघारी धाडलं आहे. अवघ्या 5 धावांवर मलिंगाने धवनचा त्रिफळा उडवला. धवन पाठोपाठ कर्णधार विराट कोहलीही विश्वा फर्नांडोच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यामुळे भारताला सुरुवातीच्या काही मिनीटांमध्येच धक्के देण्यात लंकेचा संघ यशस्वी झाला. यानंतर रोहीत शर्माचा अपवाद वगळता एकही खेळाडू मैदानावर टीकला नाही. लोकेश राहुल आणि केदार जाधव यांना ठराविक अंतराने माघारी धाडत अकिला धनंजयने भारताची अवस्था बिकट करुन टाकली. मात्र दुसऱ्या सामन्याप्रमाणे तिसऱ्याही सामन्यात धोनीनं एकबाजू लावून धरत आणकी विकेट पडू दिल्या नाहीत.  एकाबाजूनं विकेट पडत असताना रोहितनं मात्र आपली दमदार फलंदाजी चालू ठेवली होती. धोनी आल्यानंतर रोहितला चांगली साथ दिली. रोहित शर्माने आपले 12 शतक पुर्ण केलं. तर धोनीनंही आपले अर्धशतक पुर्ण केलं. रोहित-धोनीनं पाचव्या विकेटसाठी 157 धावांची भागिदारी करत भारताला विजय मिळवून दिला. श्रीलंकेनं दिलेल्या 218 धावांचे आव्हान भाराताने 46 व्या षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पार केलं.  रोहित शर्मानं नाबाद 124 धावा केल्या. तर धोनीनं नाबाद 67 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून अकिला धनंजयने २ तर लसिथ मलिंगा आणि विश्वा फर्नांडोने प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.

दरम्यान, श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फरृलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली. निर्धारित 50 षटकांत श्रीलंकेला 9 गड्यांच्या मोबदल्यात 217 धावापर्यंत मजल मारता आली. भारताला विजयासाठी 218 धावांचे माफक आव्हान मिळाले आहे. भारतीय गोलंदाजांनी आज टिचून मारा केला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोत तिसऱ्या वन-डे सामन्यात श्रीलंकेची अवस्था अतिशय बिकट झालेली पहायला मिळाली. लंकेच्या फलंदाजांना धावासाठी संघर्ष करवा लागला. एकामागोमाग एक विकेट जाण्याचं सत्र सुरु असतानाच थिरीमनेने लंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. थिरीमनेचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने मैदानावर टिकून भारतीय गोलंदाजीचा दीर्घकाळ सामना केला नाही. मात्र त्याला माघारी धाडण्यात जसप्रीत बुमराहला यश आलं. केदार जाधवकडे झेल देत तो माघारी परतला. थिरीमनने 105 चेंडूचा सामना करताना 80 धावांची खेळी केली. यापाठोपाठ थोड्याच अंतराने श्रीलंकेचा कर्णधार चमार कपुगेदरा अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर जसप्रीत बुमराहने अकिला धनंजयाचा त्रिफळा उडवत लंकेला आणखी अडचणीत ढकललं.

बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी लंकेच्या फलंदाजावर वर्चस्व गाजवले. पहिल्या दोन धक्क्यातून लंका सावरेल असे वाटत असतानाच पांड्याने तिसरा धक्का दिला. दिनेश चंदीमल पांड्याच्या गोलंदाजीवर बुमराहकडे झेल देत माघारी परतला. त्याने 36 धावांची खेळी केली. दिनेश चंदीमल आणि थिरीमने व्यातिरिक्त एकाही फलंदाजाला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. ठराविक अंतरावर बळी गेल्यामुळे लंकेला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.  बुमराहने पाच फलंदाजांची शिकार केली तर पांड्या, केदार आणि पटेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. 

प्रेक्षकांची हुल्लडबाजीभारत विजयापासून फक्त ८ धावा दूर असतानाच श्रीलंकेच्या समर्थकांनी मैदानावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकायला सुरुवात केली. त्यामुळे सामना ३५ मिनिटे थांबवण्यात आला. त्यानंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला आणि भारताने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. या घटनेने १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही संघांत कोलकाता येथे झालेल्या उपांत्य सामन्याच्या आठवणींना उजाळा मिळाला. त्या वेळी भारत पराभवाच्या जवळ पोहोचल्यानंतर कोलकातामधील प्रेक्षकांनी मैदानातील स्टॅण्डलाआग लावून दिली होती. तसेच बाटल्याही फेकल्या होत्या. त्या सामन्यात श्रीलंकेला विजयी करण्यात आले होते.

महेंद्रसिंह धोनीने अझरुद्दीनला टाकले मागेमहेंद्रसिंह धोनीने आज ६७ धावांची खेळी करताना एकदिवसीय सामन्यात माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले. धोनीने ९४४२ धावा केल्या. अझरुद्दीनच्या ९३७८ धावा होत्या. नऊ हजार धावांचा पल्ला पार करणारा धोनी हा दुसरा यष्टिरक्षक ठरला. कुमार संघकारा १३३४१ धावांसह आघाडीवर आहे.

धावफलक श्रीलंका : निरोशन डिकवेला पायचीत गो. बुमराह १३, दिनेश चंदीमल झे. बुमराह गो. पंड्या ३६, कुसाल मेंडिस झे. रोहित गो. बुमराह १, लाहिरू थिरिमाने झे. जाधव गो. बुमराह ८०, मॅथ्यूज पायचीत गो. यादव ११, चामरा कापुगेदरा त्रि. गो. अक्षर १४, मिलिंदा श्रीवर्धने त्रि. गो. बुमराह २९, अकिला धनंजय त्रि. गो. बुमराह २, दुष्मंता चमिरा धावबाद ६, विश्व फर्नांडो नाबाद ५, लसिथ मलिंगा नाबाद १, अवांतर : १९, एकूण : ५० षटकांत ९ बाद २१७ धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर ९-२-४१-०, बुमराह १०-२-२७-५, चहल १०-०-४९-०, पंड्या ८-०-४२-१, अक्षर १०-१-३५-१, जाधव ३-०-१२-१.भारत : रोहित शर्मा नाबाद १२४, शिखर धवन गो. मलिंगा ५, विराट कोहली झे. चमिरा गो. फर्नांडो ३, लोकेश राहुल झे. थिरुमाने गो. धनंजय १७, केदार जाधव पायचीत गो. धनंजय ०, महेंद्रसिंह धोनी नाबाद ६७. अवांतर २, एकूण : ५० षटकांत ४ बाद २१८ धावा, गोलंदाजी - मलिंगा ५-०-२५-१, फर्नांडो ८.१-२-३५-१, चमिरा १०-१-५९-०, मॅथ्यूज् ३-०-१७-०, धनंजय १०-०-३८-२, श्रीवर्धने ९-०-४३-०

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयरोहित शर्माएम. एस. धोनीविराट कोहली