ख्राईस्तचर्च : बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विशेष टी२० सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आशिया एकादश संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्याचा स्पर्धेतील सहभाग त्याच्यावर असणाऱ्या वर्कलोडवर अवलंबून असणार आहे.
बांगलादेशमध्ये आशिया एकादश व जागतिक एकादश या संघादरम्यान दोन टी२० सामने खेळले जाणार आहेत. बांगलादेशने आशिया एकादशचा संघ जाहीर केला असून त्यात कोहलीचा समावेश आहे.
बीसीसीआयच्या सूत्रानुसार ‘बांगलादेश क्रिकेट मंडळाने आम्हाला दहा खेळाडूंची यादी मागवली होती. परंतु, आम्ही ५ खेळाडूच पाठवू शकतो. मात्र यात कोणते खेळाडू असतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंवरील कार्यभाराचा विचार केला जाणार आहे.’
बीसीसीआयच्या अन्य एका अधिकाºयाने सांगितले की, ‘या स्पर्धेत सहभागी व्हायचे की नाही, हे कोहलीवर अवलंबून आहे. आयपीएलसाठी खूप प्रवास करावा लागणार असल्याचेही लक्षात घ्यावे लागणार आहे.’ (वृत्तसंस्था)