विराट कोहली ब्रिस्बेनमध्येही शतक झळकवू शकतो, असे टीम इंडियाचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना (बॉर्डर गावस्कर ट्रॉफी) गाबा येथे खेळवला जाणार आहे. विराटने पर्थमध्ये शतक झळकावले होते, तर ॲडलेडमध्ये तो फ्लॉप ठरला होता. आता शनिवारी अर्थात 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विराटची बॅट कमाल करू शकते आणि तीन आकड्यांची धावसंख्या बघायला मिळू शकते, असा विश्वास सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला आहे.
पर्थमध्ये कसोटी शतक झळकावल्यानंतर, विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. सुनील गावसकर म्हणाले, विराट कोहलीला त्यांच्या आणि इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूक यांच्या एलिट क्लबमध्ये सामील होण्याची संधी आहे, ज्यांनी ऑस्ट्रेलियातील पाचही प्रमुख कसोटी ठिकानांवर शतके झळकावली आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत ॲडलेड, पर्थ, सिडनी आणि मेलबर्न येथे कसोटी क्रिकेटमध्ये शतके झळकावली आहेत. ब्रिस्बेनमध्ये त्याच्याकडून शतकाची अपेक्षा आहे.
सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले, ""जर त्याने ब्रिस्बेनमध्ये शतक झळकावले तर हे खूपच चांगले होईल. हा एक इन्सेन्टिव्ह आहे. कारण आपल्याला माहिती आहे की, आपण ब्रिसबेनमध्ये शतक झळकावले, तर एका क्लबमध्ये सामील होता. जो ऑस्ट्रेलियात प्रत्येक ठिकाणी शतक बनवणारा आहे. यानंतर तो मेलबर्न आणि सिडनीमध्ये खेळेल, तेथे त्याने कसोटी शतके झळकावली आहेत. यामुळे तो तेथेही शतक ठोकू शकतो. अर्थात तो या सीरीजमध्ये चार शतके झळकवू शकतो."