मुंबई - विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी ३३वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक झळकावले. या शानदार कामगिरीसह त्याने आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले. कोहलीने यावेळी दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हीलियर्स (८७२) याला मागे टाकत अग्रस्थान काबिज केले. कोहलीचे आता ८७६ गुण झाले असून ९०० चा जादुई आकडा गाठण्यासाठी त्याला २४ गुणांची आवश्यकता आहे.
उजव्या हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे डिव्हिलियर्स ६ सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या ३ सामन्यांसाठी संघाबाहेर आहे. त्याचाच फटका डिव्हिलियर्सला बसला असून सध्या कोहलीचा सुरु असलेला धडाका पाहता त्याला गाठणे डिव्हिलियर्ससाठी एक आव्हान ठरेल.
एकदिवसीय फलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा हिटमॅन रोहित शर्मा (८१६) चौथ्या क्रमांकावर असून त्याच्यापुढे आॅस्टेÑलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (८२३) आहे. रोहितने या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी तो वॉर्नरला मागे टाकू शकतो. कोहली आणि रोहित शिवाय अव्वल दहा फलंदाजांमध्ये अन्य भारतीय नसून डिव्हिलियर्ससह दक्षिण आफ्रिकेचे एकूण चार फलंदाज अव्वल दहामध्ये आहेत. यामध्ये क्विंटन डिकॉक (सहाव्या स्थानी), फाफ डू प्लेसिस (नववा) आणि हाशिम आमला (दहावा) यांचा समावेश आहे. भारताचे महेंद्रसिंग धोनी आणि शिखर धवन अनुक्रमे १३व्या आणि १४व्या स्थानी आहेत.