नवी दिल्ली - दिल्लीतील मादाम तुसाद संग्रहालयात बुधवारी मोठा गाजावाजा करून विराट कोहलीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र विराटचा हा पुतळा पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. तसेच विराटच्या पुतळ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चढाओढ सुरूच झाली. या गर्दीत काही हुल्लडबाज चाहत्यांनी घातलेल्या गोंधळादरम्यान विराटच्या पुतळ्याचा डावा कान तोडला गेला.
मादाम तुसाद संग्रहालयास भेट देणाऱ्यांना सेलिब्रेटिंच्या पुतळ्यासोबत फोटो काढण्याची परवानगी आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना आपल्या हिरोंजवळ उभे राहण्याची अनुभूती मिळावी म्हणून मादाम तुसादच्या व्यवस्थापनाने ही परवानगी दिलेली आहे. येथील संग्रहालयाला भेट देणारे चाहतेही शिस्तबद्धपणे सेलिब्रेटींचे पुतळे पाहतात. मात्र येथे भेट देणाऱ्यांनी एखाद्या पुतळ्याचे नुकसान करण्याची ही पहिलीच घटना आहे.
येथे विराटच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यापासून दरदिवशी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. त्याचदरम्यान विराटच्या पुतळ्यासोबत फोटो काढण्याच्या नादात हा प्रकार घडला. त्यानंतर संग्रहालयाच्या प्रशासनाने तातडीने कारवाई करत पुतळ्याचा तुटलेला कान तात्काळ दुरुस्त केला.