मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची तुलना सतत महान फलंदाज सचिन तेंडुलकर सोबत केली गेली आणि यापुढेही सुरू राहील. कोहलीची प्रत्येक खेळी ही मास्टर ब्लास्टरच्या कोणत्या ना कोणत्या विक्रमाला आव्हान देणारी ठरत आली आहे. त्यामुळे तेंडुलकरचे अनेक विक्रम हा फक्त आणि फक्त कोहलीच मोडू शकतो, असा ठाम विश्वास चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. याही वेळेला कोहलीने तो विश्वास सार्थ ठरवत तेंडुलकरला मागे टाकले आहे. पण तेंडुलकरचा हा विक्रम मोडण्यासाठी चाहत्यांनीच कोहलीला सहकार्य केले आहे.
कॅप्टन कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच धर्तीवर कसोटी व वन डे मालिकेत पराभवाची धूळ चाखवली. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा कोहली हा भारताचा आणि आशियातील पहिलाच कर्णधार ठरला. त्यापाठोपाठ त्याने न्यूझीलंडमध्येही वन डे मालिका जिंकली. 2009 नंतर भारतीय संघाने प्रथमच न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.