नवी दिल्ली, दि. 4 - वा-याच्या वेगाने धावणारा, वेगाचा बादशाह अशी ख्याती असणारा जमैकाचा धावपटू उसैन बोल्ट निवृत्ती घेत आहे. पृथ्वीतलावरचा सर्वात वेगवान धावपटू आणि १०० मीटर व २०० मीटर विश्वविक्रमाचा मानकरी असलेला उसैन बोल्ट, लंडनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पिअन्सशिपमध्ये आज (शुक्रवारी) आपल्या अविस्मरणीय कारकीर्दीतील शेवटची शर्यत धावणार आहे. या शर्यतीसाठी त्याच्यावर जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत. या शुभेच्छुकामध्ये आता भारतीय कर्णधार विराट कोहलीचे नाव सामील झाले आहे. विराटने ट्विटरद्वारे उसैन बोल्टला त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या शर्यतीसाठी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत उसैन बोल्टला शुभेच्छा तर दिल्याच त्याशिवाय त्याला क्रिकेट खेळण्याचे आमंत्रण दिले आहे. या पोस्टमध्ये विराट म्हणतो, शुक्रवारी तुझी शेवटची रेस असेल, पण धावपट्टी बाहेर आणि धावपट्टीवर तूच बादशाह राहणार आहे. त्यासाठी माझ्या तुला शुभेच्छा! जर तू क्रिकेट खेळण्याचा विचार करत असेल तर तूझं स्वागत:च आहे.
कदाचित तुम्हाला माहित नसेल पण बोल्टला क्रिकेट खूप आवडते. गोलंदाजीत वकार युनुस त्याचा आवडता खेळाडू. पाकिस्तान ही त्याची फेव्हरिट क्रिकेट टीम.सचिन तेंडुलकर अन् ख्रिस गेल हे दोघं आवडते फलंदाज आहेत.
उसेन बोल्टचे रेकॉर्डस्
- 100 मीटर, 200 मीटर आणि 4*100 रिले शर्यतीत विश्वविक्रम प्रस्थापित करणारा एकमेव खेळाडू.
100 मीटर - 9.58 सेकंद
२०० मीटर - 19.19 सेकंद
4*100 मीटर रिले - 36.84
- बोल्टचा धावण्याचा वेग 44 किलोमीटर प्रति तास इतका आहे. (सर्वसाधारण माणसाचा वेग 28-30 किलोमीटर प्रति तास)
- 100 मीटर अंतर ओलांडण्यासाठी बोल्ट केवळ 41 पाऊलं टाकतो. (सर्वसाधारण माणूस 50-52 पाऊलं टाकतो)
- आयएएफएफ ऍथलेट ऑफ द इयर पुरस्कार विक्रमी 6 वेळा पटकावला आहे.
- 11 वेळा विश्वविजेता आणि 9 वेळा ऑलम्पिक विजेता अशी बोल्टची ख्याती आहे.
- 2008, 2012, 2016 या सर्व ऑलम्पिक स्पर्धांमध्ये त्याने सर्व प्रकारात सलग 3 वेळा सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला आहे आणि हे करणारा तो एकमेव धावपटू.
- फोर्ब्सच्या यादीत सर्वात जास्त रक्कम मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बोल्टचा 23 वा क्रमांक आहे.
- उसेन बोल्ट सोसिअल माध्यमांवर देखील अग्रेसर आहे त्याला फेसबुकवर तब्बल 1 कोटी 93 लाख लोक फॉलो करतात तर ट्विटर आणि इंस्टाग्रामवर देखील हा आकडा 70 लाखांच्या घरात जातो.