दिल्ली: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी दु:खद बातमी आहे. विराटला लहान असताना त्याला क्रिकेटचे धडे देणारे प्रशिक्षक सुरेश बत्रा यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वरिष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी बत्रा यांच्या निधनाची माहिती ट्विटरवर दिली.
महिलांपेक्षा पुरुष क्रिकेटपटूंना मिळते १४ पट अधिक रक्कम! वाचा, कोणाला किती मिळतात पैसै?
'टी-शर्ट परिधान केलेले सुरेश बत्रा, ज्यांनी विराट कोहलीला लहानपणी प्रशिक्षण दिलं, गुरुवारी त्यांचं निधन झालं. गुरुवारी सकाळी पूजा करत असताना ते अचानक कोसळले. त्यानंतर ते उठू शकले नाहीत,' असं लोकपल्ली यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. बत्रा यांच्या निधनानं लहान भाऊ गमावल्याची भावना कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मांनी व्यक्त केली. राजकुमार शर्मा आणि सुरेश बत्रा एकमेकांना १९८५ पासून ओळखायचे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका एक आठवडा आधी सुरू करा : बीसीसीआय
क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला विराट कोहली पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीत प्रशिक्षणासाठी यायचा. त्यावेळी राजकुमार शर्मा प्रमुख प्रशिक्षक होते, तर सुरेश बत्रा त्याच अकादमीत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करायचे. विराट कोहलीच्या फलंदाजीला पैलू पाडण्यात, त्याला फलंदाज म्हणून घडवण्यात राजकुमार शर्मा आणि सुरेश बत्रा यांचा मोलाचा वाटा आहे.
राजकुमार शर्मा आणि सुरेश बत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली विराट वयाच्या ९ व्या वर्षापासून प्रशिक्षण घेऊ लागला. सुरेश बत्रा यांनी विराटसोबतच आणखी काही खेळाडू घडवले. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मनज्योत कालरादेखील बत्रा यांनीच प्रशिक्षण दिलं. कालरानं २०१८ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात शतक झळकावलं. भारतीय संघाच्या विजयात त्याचं महत्त्वाचं योगदान होतं.