नवी दिल्ली - जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीने नागपूरपाठोपाठ दिल्लीचा फिरोजशाह कोटलावरही द्विशतकी धमाका केला आहे. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कोहलीने लंकेच्या गोलंदाजांची धुलाई करताना सलग दुसऱ्या सामन्यात आपले द्विशतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमधील विराटचे हे सहावे द्विशतक आहे. विराटच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर भारताने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केली आहे.
आज दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर विराट कोहली आणि रोहित शर्माने लंकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली. त्यामुळे पहिल्या सत्रात श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दबाव राहिला.
तत्पूर्वी, खेळाच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीचे सलग तिसरे आणि सलामीवीर मुरली विजयच्या सलग दुसºया शतकाच्या बळावर भारताने तिस-या कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंकेविरुद्ध वर्चस्व मिळवित ९० षटकांत ४ बाद ३७१ धावा उभारल्या. दोघांनी तिस-या गड्यासाठी २८३ धावांची भागीदारीही केली. भारताच्या दोन फलंदाजांनी दिवसभरात प्रत्येकी दीडशे धावा ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारताने पहिल्या सत्रात २७ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात ११६, दुस-या सत्रात ३० षटकांत गडी न गमाविता १२९ आणि तिस-या सत्रात ३३ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात १२६ धावा वसूल केल्या. फलंदाजीला अनुकूल वाटणाºया कोटलाच्या खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल जिंकताच कोहलीने फलंदाजी घेतली होती.