ब्रिस्बेन: ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर वारंवार झेलबाद होणाऱ्या विराट कोहलीला दिग्गज सुनील गावसकर यांनी सोमवारी मोलाचा सल्ला दिला. जेव्हा आपण अपयशी ठरत जातो, तेव्हा आपल्या हिरोचे स्मरण करायला हवे. सचिन तेंडुलकरने सिडनीमध्ये खेळलेली नाबाद २४१ धावांची खेळी एकदा पाहा आणि त्यातून काय तो बोध घे, असे गावसकर म्हणाले.
गाबा कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कोहली तीन धावा करून कव्हर ड्राइव्ह खेळताना बाद झाला. २००३-०४ च्या दौऱ्यात सचिनसोबत अशीच घटना घडली. त्यानंतर त्याने सिडनी कसोटीत एकही कव्हर ड्राइव्ह न खेळता २४१ धावा केल्या आणि ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू कायम सोडून दिला होता.
आज वेगवान गोलंदाज हेजलवूडने कोहलीला यष्टिरक्षक केरीकडे झेलबाद केले. गावसकर म्हणाले, विराटने आपला हिरो सचिनचा कित्ता गिरवायला हवा. सचिनने येथे ३३ चौकारांसह ४३६ चेंडूंत नाबाद २४१ धावा ठोकल्या होत्या. त्याआधी सचिनदेखील यष्टीमागे झेलबाद होत होता. कोहलीने सध्याच्या दौऱ्यात ५, नाबाद १००, ७, ११ आणि ३ धावा केल्या. सचिनने दहा तासांहून अधिक वेळ खेळपट्टीवर राहूनदेखील एकही कव्हर ड्राइव्ह खेळला नव्हता.
ऑन ड्राइव्हवर त्याने बऱ्याचशा धावा काढल्या. विराटने वारंवार चुका करण्याऐवजी आपले डोके शांत ठेवून खेळावर लक्ष केंद्रित करावे. स्वतःची चूक दुरुस्त करण्यासाठी ड्राइव्हऐवजी बॉटम हॅन्ड शॉट खेळण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
पुनरागमन करणार
कोहलीने ऑस्ट्रेलियन दाँयाची सुरुवात पर्थमध्ये दुसऱ्या डावात शतक ठोकून केली. कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली. मात्र, यानंतर पुढील तीन डावांत त्याला मोठी धावसंख्या करता आली नाही. गावसकर यांनी मात्र या मालिकेत पुनरागमन करण्यासाठी कोहलीला अजूनही वेळ आहे, असा विश्वास व्यक्त्त केला, गावसकर म्हणाले, कोहलीने हे आधीच सिद्ध केले आहे. मानसिक नियंत्रणाशिवाय तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावा आणि ३२ शतके करू शकत नाही. कोहलीला अजूनही या समस्येवर मात करण्याची संधी आहे.