दुबई : ऑस्ट्रेलिया विरोधातील तीन सामन्यांच्या मालिकेत दोन अर्धशतक करणारा भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. कोहलीने दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ८९ आणि ६३ धावा केल्या होत्या. त्याने रँकिंगमध्ये ८७० गुण मिळवले आहे तर रोहित शर्मा (८६५ गुण) दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम तिसऱ्या स्थानावर आहे. हार्दिक पांड्या फलंदाजांच्या यादीत ४९ व्या स्थानावर पोहचला आहे. तर
त्याने पहिल्या सामन्यात ९० आणि तिसऱ्या सामन्यात ९२ धावा केल्या. तो पहिल्यांदाच अव्वल ५० फलंदाजांमध्ये सहभागी झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरोन फिंच पाचव्या स्थानी आहे. पहिल्या दोन सामन्यात शतक झळकावणारा स्टीव्ह स्मिथ २०१८ नंतर प्रथमच १५ व्या स्थानावर आला आहे. ग्लेन मॅक्सवेल फेब्रुवारी २०१७ नंतर प्रथमच २० व्या स्थानी आला आहे. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह तिसऱ्या, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट ७२२ गुणांसह अव्वल स्थानी आहे.
वन-डेमध्ये कोहली दशकातील प्रभावी खेळाडू
मुंबई : सामना जिंकवून देण्याच्या कामगिरीत कर्णधार विराट कोहली गेल्या दहा वर्षांत भारताचा सर्वात प्रभावी खेळाडू ठरला आहे, असे मत माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.
भारतातर्फे २००८ मध्ये पदार्पण करणारा कोहली गेल्या दशकात सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून पुढे आला आहे. त्याने अलीकडेच महान फलंदाज सचिन तेंडुलकरला पिछाडीवर सोडताना वन-डेमध्ये सर्वात जलद १२ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम नोंदवला आहे. स्टार स्पोर्ट्सचा कार्यक्रम ‘क्रिकेट कनेक्टेड’मध्ये बोलताना गावसकर म्हणाले,‘माझ्या मते वैयक्तिक कामगिरीचा विचार केला तर निश्चितच विराट कोहलीचे नाव घेईल. लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिलेले आहेत.’
गावसकर म्हणाले,‘मी केवळ धावा व बळींच्या संख्याचा विचार न करता खेळाडूचा प्रभाव बघतो. यात या दशकात विराट कोहली सर्वोत्तम असल्याचे तुम्हाला मानावे लागेल. भारतीय संघाने जिंकलेल्या लढतींमध्ये त्याचा प्रभाव अधिक आहे.’ ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडन मात्र गावसकरच्या विचारासोबत सहमत नाही. हेडनच्या मते या दशकातील सर्वांत प्रभावी भारतीय खेळाडू महेंद्रिसंग धोनी आहे.