Join us  

Virat Kohli: म्हणून विराट कोहलीनं सोडलं नाही वनडे संघाचं कर्णधारपद, समोर आलं मोठं कारण...

Virat Kohli News: विराटच्या राजीनाम्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्यापासूनच त्याचे एकदिवसीय संघातील कर्णधारपदही धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 9:03 PM

Open in App

मुंबई - भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. विराटच्या राजीनाम्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्यापासूनच त्याचे एकदिवसीय संघातील कर्णधारपदही धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. काही तज्ज्ञांच्या मते जर भारताने टी-२० विश्वचषक जिंकला नाही तर विराटच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाबाबतही मोठा निर्णय होऊ शकतो. विराटने आता एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद सोडले पाहिजे, असा काही तज्ज्ञांकडून सल्ला दिला जात आहे. मात्र आपल्या ब्रँड व्हॅल्यूला निर्माण होणारा धोका विचारात घेऊन विराट कोहलीने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडले नसल्याचा दावा करण्यात येत आहे. (So Virat did not give up the captaincy of the ODI team)

द टेलिग्राफ इंडिया च्या रिपोर्टनुसार ३२ वर्षीय विराट कोहली एकदिवसीय संघाचे नेतृत्व यापुढेही करू इच्छितो. याचं कारण म्हणजे मर्यादित क्रिकेटमधील संघांचे नेतृत्व पूर्णपणे सोडल्यास ब्रँड व्हॅल्यूवर परिणाम होऊ शकतो. मात्र तज्ज्ञांनी ही शक्यता नाकारली आहे. त्यांच्या मते कर्णधारपद सोडल्याने सचिन तेंडुलकरच्या ब्रँड व्हॅल्यूवरही परिणाम झाला नव्हता. तो निवृत्तीनंतरही अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बॅसेडर आहे.

दरम्यान, बीसीसीआयने कोहलीच्या जागी नव्या टी-२० कर्णधाराचीही निवड केलेली नाही. मात्र पाच वेळचा आयपीएलविजेता रोहित शर्मा टी-२० कर्णधारपदासाठी आघाडीवर आहे. मात्र अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. त्याशिवाय ओपनर के.एल राहुल आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यांची नावेही कर्णधारपदासाठी आघाडीवर आहेत. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हाही कर्णधारपदाचा दावेदार आहे.

विराट कोहली आता आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करताना दिसणार आहे. विराटचा संघ स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात ७ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता आपल्या संघाला आयपीएल विजेतेपद मिळवून देण्याचे आव्हान विराट कोहलीसमोर असेल.  

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App