क्रिकेट जगतातील किंग विराट कोहली तब्बल १२ वर्षांनी पुन्हा एकदा रणजी मॅच खेळण्यासाठी सज्ज झालाय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी तो रणजी स्पर्धेतील सामना खेळण्यासाठी दिल्लीच्या ताफ्यात सामील झाला अन् त्याच्या प्रॅक्टिस पासून ते अगदी त्यानं लंच काय केला? या गोष्टी चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. फिटनेसवर फोकस करणारा विराट कोहली व्यायामासह संतुलित आहार घेण्यावर भर देतो. डाएट फॉलो करत असताना तो आपल्या आवडीच्या पदार्थांवरही ताव मारतो, आता रणजी सामन्यासाठी मैदानात उतरण्याआधी त्याने लंच वेळी जुन्या दिवसांतील आठवणीला उजाळा देणाऱ्या खाद्य पदार्थाला पसंती दिल्याचा मुद्दा चर्चेत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
छोले पुरी आणून ठेवली, पण विराट म्हणाला हे नको मला!
दिल्लीकर असल्यामुळे छोले पुरी हा त्याच्या आवडीच्या पदार्थांमध्ये अगदी टॉपला असलेला पदार्थ आहे. अनेकदा विराट कोहलीनं त्यासंदर्भातील गोष्ट बोलूनही दाखवली आहे. त्याची ही पसंत लक्षात घेऊन विराट प्रॅक्टिसला येणार हे कळल्यावर दिल्ली अँण्ड जिल्हा क्रिकेट असोसिएशननं त्याच्या आवडीची डिश असलेल्या छोले पुरीची खास व्यवस्था केली होती. पण विराटनं लंच वेळी या स्पेशल डिशवर ताव मारण्यापेक्षा जुन्या खाद्य पदार्थाला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. छोले पुरी नको मला म्हणत त्याने जुन्या आवडीच्या पदार्थावर ताव मारल्याची गोष्ट चर्चेत आहे.
लंचमध्ये विराटनं 'कढी भात' खाण्याला दिली पसंती, कारण...
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये विराट कोहलीच्या खवय्येगिरीचा किस्सा शेअर केला आहे. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीसाठी दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापनाने खास छोले पुरी ऑर्डर केली होती. पण विराट कोहलीने ही डिश नको मला असे म्हटलं. तो बदलेला नाही असं सांगत संबंधित अधिकाऱ्यानं स्टार क्रिकेटरनं इतर खेळाडूंसोबत कढी भात खाल्ल्याचा किस्सा शेअर केला आहे. यामागचं कारण एकदम खास आहे. कारण हा पदार्थ विराट कोहलीच्या सुरुवातीच्या आवडीच्या पदार्थांपैकी एक आहे.
वॉर्मअप, प्रॅक्टिस अन् लंच प्रत्येक गोष्ट ठरतीये चर्चेचा विषय
दिल्लीच्या ताफ्यातून विराट कोहली रणजी स्पर्धेत रेल्वे विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. या सामन्यासाठी त्याने कसून सराव केल्याचे पाहायला मिळाले. तासभर नेटमध्ये प्रॅक्टिस करण्याआधी किंग कोहलीनं जवळपास अर्धा तास वार्मअपही केला. या चर्चेत त्याच्या लंचमागची खास गोष्टही चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले.