टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला विराट कोहली हा रविवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहे. विराट कोहलीला खेळताना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. तसेच या मालिकेसाटी विराट कोहली कसून सराव करत आहे. दरम्यान, या मालिकेपूर्वी विराट कोहली एका स्वाक्षरीमुळे अडचणीत सापडला आहे.
विराट कोहलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या फोटोंमध्ये विराट कोहली हा पाकिस्तानच्या जर्सीवर ऑटोग्राफ देताना दिसत आहे. एका क्रिकेटप्रेमीच्या हातात ही जर्सी असून, विराट कोहली हा त्यावर ऑटोग्राफ देताना दिसत आहे. हा फोटो व्हायरल होऊ लागताच वादाला तोंड फुटले. मात्र या फोटोमागचं सत्य लवकरच समोर आलं. तसेच हा फोटो खोटा असल्याचं उघड झालं.
ज्या फोटोमध्ये विराट कोहलीला पाकिस्तानच्या जर्सीवर स्वाक्षरी करताना दाखवण्यात आलं होतं, तो फोट बनावट असल्याचं निष्पन्न झालं. मूळ छायाचित्रात डिजिटल पद्धतीने बदल करून हा फोटो तयार करण्यात आला होता. खरंतर विराट कोहली हा ऑस्ट्रेलियामधील पर्थ येथे एका क्रिकेट प्रेमीने आणलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या जर्सीवर स्वाक्षरी करत असताना हा फोटो काढण्यात आला होता. मात्र सोशल मीडियावर विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी काही मंडळींनी मुद्दाम या फोटोंमध्ये तांत्रिक माध्यमातून बदल करून तिथे पाकिस्तानची जर्सी लावून तो फोटो व्हायरल केला होता.