नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक समजला जातो. बरेच विक्रम त्याच्या नावावर आहे. काही विक्रम त्याने मोडीतही काढले आहेत. पण तरीही कोहलीने भारताचा माजी कर्णधार महेद्रसिंग धोनीकडून शिकायला हवे, असे वक्तव्य पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने केले आहे.
याबाबत आफ्रिदी म्हणाला की, " विराट कोहली हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याची फलंदाजी पाहायला मजा येते. मलादेखील त्याची फलंदाजी आवडते. विराटने बरेच विक्रमही रचले आहेत, पण तरीही त्याने धोनीकडून काही गोष्टी नक्कीच शिकायला हव्यात."
धोनी हा शांत खेळाडू म्हणून ओळखला जातो. दुसरीकडे कोहली हा आक्रमक असल्याचे बोलले जाते. दोघांचेही स्वभावही भिन्न आहेत. सध्याच्या घडीला धोनी भारताचा कर्णधार नाही. त्याचबरोबर भारताच्या कसोटी आणि ट्वेन्टी-20 संघातही धोनी नाही. पण तरीदेखील धोनीकडून कोहलीने बरेच काही शिकायला हवे, असे आफ्रिदी म्हणत आहे.
याबाबत आफ्रिदी म्हणाला की, " धोनी आणि कोहली यांचे स्वभाव भिन्न आहेत. कोहलीसारखा फलंदाज होणार नाही, असे काही जण म्हणत आहेत. पण एक कर्णधार म्हणून तो अजूनही परीपक्व झालेला पाहायला मिळत नाही. त्यामुळे संघाचे नेतृत्व कसे करायचे, हे कोहलीने धोनीकडून शिकायला हवे. "