विराट कोहली( Virat Kohli ), हा आज जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने त्याच्या दबदबा निर्माण केला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक ४९ शतकांचा विक्रम विराटने मागच्याच वर्षी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मोडला.. याशिवाय त्याने सचिनच काय तर अनेक आजी-माजी खेळाडूंचे विक्रम मोडले आहेत... पण, विराट जेव्हा कुणीच नव्हता तेव्हा त्याला मदत करणारे अनेक जणं होती आणि त्यापैकी एक नाव हे सुरेश रैना ( Suresh Raina ) आहे.. यामागची सुंदर गोष्ट विराटने सांगितली आणि ती ऐकून Mr IPL रैना याच्याप्रतीचा आदर आणखी वाढला...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) फलंदाज विराटने २००८ मध्ये रैनाने कशी त्याला मदत केली आणि त्यामुळे तो निवड समितीच्या नजरेत आला हे सांगितले. २००८ ते २०२४ या काळात विराटने कारकिर्दीत खूप काही साध्य केले आहे आणि त्यामुळेच तो जागतिक स्तरावर एक आयकॉन बनला आहे. त्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. पण, सुरेश रैना याचे बरेच श्रेय घेण्यास पात्र आहे आणि भारताच्या माजी कर्णधाराने विराटला आवश्यक असलेली मदत केली नसती तर विराटसारखा फलंदाज पाहिला नसता.
ऑस्ट्रेलियातील २००८ इमर्जिंग कप दरम्यान विराट आणि सुरेश रैना यांची भेट झाली. या स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विराट मधल्या फळीत अपयशी ठरला होता आणि त्याला बाकावर बसवले गेले होते. सुरुवातीला भारतीय संघाचे नेतृत्व एस बद्रीनाथ करत होता, परंतु नंतर सुरेश रैनाकडे ही जबाबदारी सोपवली गेली. तेव्हा रैनाने विराटला नेटमध्ये फलंदाजी करताना पाहिले आणि त्याची क्षमता पाहून तो थक्क झाला. रैनाने त्याला लगेचच ओपनिंग करशील का असे विचारले आणि विराटनेही त्याला लगेच होकार दिला. पुढच्या सामन्यात या युवा फलंदाजाने न्यूझीलंड संघाविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्यावेळी निवडकर्ता असलेले दिलीप वेंगसरकर विराटच्या खेळीने प्रभावित झाले आणि त्यांनी त्याला अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला.
विराट म्हणाला, ''मी सुरेश रैनाचा खूप आभारी आहे. त्याने माझे नाव पुढे केले. मला वाटतं तो २००८ साल होतं. आम्ही ऑस्ट्रेलियात इमर्जिंग प्लेयर्स टूर्नामेंटमध्ये खेळत होतो. त्यावेळी इमर्जिंग प्लेअर्स टूर्नामेंटचे महत्त्व हे होते की,यातूनच राष्ट्रीय वरिष्ठ संघासाठी सर्वोत्तम खेळाडूंची निवड व्हायची. अनेक देश तिथे खेळायला येणार होते आणि ही स्पर्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. प्रवीण आम्रे हे आमचे प्रशिक्षक होते आणि त्यांनी मला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले होते. कारण, काही सामन्यांत मला चांगली कामगिरी करता आली नव्हती.''
"त्यानंतर रैना आला. त्याने मला नेटमध्ये खेळताना पाहिले आणि आम्रे सरांना विचारले की, मी का खेळत नाही. मी मधल्या फळीत फलंदाजी करायचो, तर अजिंक्य रहाणेने सलामीला यायचा. सर म्हणाले की संघात एकही जागा उपलब्ध नाही. त्यानंतर रैनाने मला खेळवावे, असा आग्रह धरला. म्हणून प्रवीण सरांनी मला बोलावले आणि विचारले की मी ओपनिंगला येऊ शकतोस का?" असे RCB चा माजी कर्णधार पुढे म्हणाला.
त्याने पुढे सांगितले की, "मी म्हणालो की मी कोठेही फलंदाजी करेन, फक्त मला खेळण्याची संधी द्या. म्हणून मी न्यूझीलंडविरुद्ध ओपनिंग केली. दिलीप वेंगसरकर सर त्यावेळी निवड समिती प्रमुख होते. मी नाबाद १२०धावा केल्या होत्या आणि त्यांनी कदाचित तेव्हाच निर्णय घेतला. की मला आणखी संधी देण्यात यावी.'' क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये संधी मिळवून देण्यात रैनाच्या भूमिकेची विराटने कबुली दिली.