Join us  

आयसीसीच्या वन डे क्रमवारीत विराट कोहलीच नंबर वन

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीने जारी केलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 7:51 PM

Open in App
ठळक मुद्देभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीने जारी केलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. 873 गुणांसह कोहली या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तर त्याच्या खाली ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीरडेव्हिड वॉर्नरचा नंबर लागतो. विराट कोहली व्यतिरिक्त एकाही भारतीयला टॉप 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवता आलेलं नाही.याशिवाय एकाही भारतीय गोलंदाजाला टॉप टेनमध्ये स्थान मिळवता आलेलं नाही.

मुंबई, दि. 18 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीने जारी केलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. 873 गुणांसह कोहली या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तर त्याच्या खाली ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीरडेव्हिड वॉर्नरचा नंबर लागतो. त्याचे 861 गुण आहेत. तर तिस-या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलिअर्स आहे, त्याचे 847 गुण आहेत. 

रविवारपासून दांबुला येथे भारताची लंकेविरोधात 5 सामन्यांच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. सध्या दुस-या क्रमांकावरील डेव्हिड वॉर्नर आणि कोहलीमध्ये 12 पॉईंट्सचा फरक आहे. त्यामुळे या मालिकेत दमदार प्रदर्शन करून हे अंतर अजून वाढवण्याची संधी कोहलीकडे आहे. 

विराट कोहली व्यतिरिक्त एकाही भारतीयला टॉप 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. या गुण तालिकेत महेंद्रसिंग धोनी (12 व्या), शिखर धवन (13 व्या) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (14 व्या) स्थानी आहे.  याशिवाय एकाही भारतीय गोलंदाजाला टॉप टेनमध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीचा विचार करता 114 पॉइंट्स मिळवून भारतीय संघ तिस-या स्थानी आहे. 119 पॉईंट्स मिळवून दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल ठरला आहे तर दुस-या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे 117 पॉईंट्स आहेत.  श्रीलंका 88 पॉईंट्सने आठव्या स्थानावर आहे.   क्रमवारीतील तिसरा क्रमांक कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला लंकेविरोधातील मालिका 4-1 अशी जिंकणं गरजेचं आहे. भारताचे आता 114 पॉईंट्स आहेत, जर 3-2 ने भारताने मालिका जिंकली तरी भारताला एका पॉईंटचा फटका बसेल आणि 113 पॉइंट होतील आणि संघ चौथ्या क्रमांकावर फेकला जाईल.  

आयसीसी कसोटी रॅंकिंग: लोकेश राहुल पहिल्यांदाच टॉप 10 मध्ये-

 कसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारून व्हाइटवॉश देणा-या भारतीय संघाने आयसीसी क्रमवारीत आपला दबदबा कायम ठेवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत टीम इंडियाने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारतीय संघाचा सलामीवीर के.एल.राहुल करिअरच्या सर्वोच्च रॅंकिंगवर पोहोचला आहे.    

श्रीलंकेच्या मालिकेपूर्वी 11 व्या क्रमांकावर असणा-या राहुलला सातत्यपूर्ण कामगिरीचा चांगलाच फायदा झाला. त्याने पहिल्यांदाच टॉप 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवलं असून तो 9 व्या स्थानावर आला आहे. संघांच्या क्रमवारीमध्ये भारतीय संघाने अव्वल स्थान कायम राखलं असून लंकेचा संघ सातव्या क्रमांकावर कायम आहे. टीम इंडिया 125 रेटिंगसह पहिल्या स्थानावर कायम आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुस-या स्थानावर आहे. आफ्रिकेच्या संघापेक्षा भारत 15 अंकांनी पुढे आहे. आफ्रिकेच्या संघाचे 110 रेटिंग आहेत. 

टॉप 10 टेस्ट रॅंकिंगमध्ये भारताचे 4 फलंदाज -पल्लेकल कसोटीत 85 धावांची खेळी करणा-या राहुलला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो 9 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. यासोबतच टीम इंडियाच्या 4 फलंदाजांनी आयसीसीच्या टॉप 10 रॅंकिंगमध्ये स्थान मिळवलं आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा (4), विराट कोहली (5), केएल राहुल(9) आणि अजिंक्य रहाणे (10) यांचा समावेश आहे. पांड्या-शमी-उमेश यादव यांना झाला फायदा-पल्लेकल कसोटीत ऑलराउंडर हार्दिक पांड्याने 96 चेंडूंमध्ये 108 धावांची खेळी केली. त्याचा त्याला चांगलाच फायदा झाला असून आयसीसी क्रमवारीत त्याने 45 स्थानांची झेप घेतली आहे. तो फलंदाजांच्या क्रमवारीत 68 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. करियरमधील त्याची ही बेस्ट रॅंकिंग आहे. याशिवाय जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला एका स्थानाचा फायदा झाला असून तो गोलंदाजांच्या क्रमवारीत 19 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. उमेश यादवलाही एका स्थानाचा फायदा झाला असून तो 21 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.  रवींद्र जडेजाच्या रॅंकिंगमध्ये घसरण-अष्टपैलूंच्या क्रमवारीत रविंद्र जडेजाची घसरण झाली आहे. त्याचं अव्वल स्थान पुन्हा एकदा बांगलादेशच्या शाकिब अल हसनने मिळवलं आहे. श्रीलंकेच्या मालिकेत तिस-या सामन्यात बंदीमुळे जडेजा खेळू शकला नव्हता, त्यामुळे एका गुणाचा फटका त्याला बसला आणि बांगलादेशच्या शाकिब अल हसनला त्याचा फायदा  झाला.   तरी गोलंदाजांच्या क्रमवारीत जडेजा क्रमांक एकवर कायम आहे. 

टॅग्स :विराट कोहलीडेव्हिड वॉर्नरक्रिकेटएबी डिव्हिलियर्स