Virat Kohli, BCCI Rules: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने दोन सहज विजयांसह सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आधी बांगलादेश आणि मग पाकिस्तान अशा दोन संघांना पराभवाची धूळ चारून भारताने दिमाखात पुढील फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीपूर्वी टीम इंडियाला ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. पण त्याआधी टीम इंडियाला एका आठवड्याचा ब्रेक मिळाला आहे. या ब्रेकमध्ये भारतीय खेळाडू काही दिवस विश्रांती घेत आहे तर काही दिवस सराव करत आहेत. तशातच संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा एक फोटो व्हायरल झाला असून, त्याने बीसीसीआयचे नियम मोडले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जाणून घेऊना नेमके काय आहे हे प्रकरण.
कोहलीबद्दल नेमका दावा काय?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. या सामन्यात विराटने शानदार नाबाद शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. त्याच वेळी, विराट कोहलीने विश्रांती घेण्यासोबतच आयपीएलशी संबंधित शूटिंगचे कामही सुरु केले आहे. सोशल मीडियावर विराटचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या जर्सीमध्ये दिसत आहे. या फोटोसह असा दावा केला जात आहे की कोहलीने दुबईतील टीम हॉटेलमध्ये ही जर्सी घातली होती आणि या काळात तो IPL 2025 साठी शूटिंग करत होता. हे फोटोशूट जिओहॉटस्टारसाठी केले जात होते.
कोहलीने खरंच नियम मोडला?
या व्हायरल फोटोमुळे प्रश्न निर्माण झाला आहे की, कोहलीने बीसीसीआयचा नियम मोडला आहे का? गेल्या महिन्यातच, बीसीसीआयने खेळाडूंसाठी नवीन नियम (मार्गदर्शक तत्वे) जारी केले होते, ज्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले होते की खेळाडू कोणत्याही स्पर्धा किंवा मालिकेदरम्यान वैयक्तिक फोटोशूट किंवा जाहिरातीचे शूट करणार नाहीत. पण कोहलीने कुठलाही नियम मोडलेला नाही. बीसीसीआयने खेळाडूंच्या वैयक्तिक जाहिराती किंवा जाहिरातींबाबत हे नियम बनवले आहेत. आयपीएल ही बीसीसीआयची स्पर्धा आहे आणि तो त्यांच्या अधिकृत प्रायोजक व प्रसारकांसाठी शूट करत होता. त्यामुळे हे शूट वैयक्तिक किंवा जाहिरातींच्या श्रेणीत येत नाही.
दरम्यान, यंदा कोहली आपल्या RCB संघात नव्या कर्णधारासह खेळणार आहे. फाफ डू प्लेसिसला अलविदा केल्यानंतर बेंगळुरू संघाची धुरा रजत पाटीदारच्या हाती दिली आहे. त्यामुळे IPL 2025 मध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली कोहली खेळणार आहे.