RCB new plan IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाबाबत आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. आरसीबीचा संघ आगामी हंगामात आपले काही 'होम मॅचेस' (घरचे सामने) बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमऐवजी इतर शहरांमध्ये खेळण्याची शक्यता आहे. आरसीबीने आपले घरचे सामने बेंगळुरूबाहेर नेण्यामागे नेमके काय कारण आहे, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियममधील नूतनीकरणाची कामे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे हा बदल केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. यापूर्वी अनेक आयपीएल संघांनी आपल्या चाहत्यांचा विस्तार करण्यासाठी आणि विविध प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी 'दुसऱ्या होम ग्राउंड'ची (Second Home Ground) संकल्पना राबवली आहे.
कोणत्या २ मैदानांची चर्चा? कारण काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवी मुंबई आणि रायपूर या दोन शहरांची नावे आरसीबीचे नवे होम ग्राऊंड म्हणून आघाडीवर आहेत. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान असून येथे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक क्षमता आहे. तसेच मुंबई आणि आसपासच्या परिसरात आरसीबीचा मोठा चाहता वर्ग असल्याने येथे सामने खेळवणे फायदेशीर ठरू शकते. दुसरे म्हणजे छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील स्टेडियम हे भारतातील सर्वात मोठ्या स्टेडियमपैकी एक आहे. येथे आयपीएलचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होते. या शहरात आयपीएलचा कोणताही संघ नसल्यामुळे आरसीबीला तेथे नवीन चाहता वर्ग मिळण्याची मोठी संधी आहे.
चाहत्यांसाठी आनंदाची पण चिंतेची बातमी
आरसीबीचे सामने नवी मुंबई आणि रायपूरमध्ये होणार असल्याच्या वृत्तामुळे तेथील क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, बेंगळुरूच्या कट्टर चाहत्यांसाठी ही बातमी थोडी निराशाजनक ठरू शकते. कारण त्यांना आपल्या आवडत्या संघाचा सामना घरच्या मैदानावर पाहण्याची संधी कमी मिळणार आहे. BCCI आणि RCB व्यवस्थापनाकडून लवकरच IPL 2026 चे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, या बदलांवर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. सध्या तरी या वृत्ताने सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांच्या चर्चेला उधाण आणले आहे.