Virat Kohli Ranji Comeback flop Viral Video : तुफान पब्लिसिटी आणि भयंकर गाजावाजा करत भारताचा रनमशिन विराट कोहली याने १३ वर्षांनंतर काल रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर हजारो चाहते जमले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांसाठी धडपडणारा कोहली रेल्वे विरुद्धच्या सामन्यात आपली लय शोधेल आणि मोठी खेळी खेळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण तसे काहीही झाले नाही. आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला. इतकेच नव्हे तर तो थेट त्रिफळाचीत झाला.
कोहली रणजी कमबॅकमध्ये 'फ्लॉप'
देशांतर्गत क्रिकेटमध्ये विराट कोहली १३ वर्षांनी खेळायला उतरला पण त्याला निराशेचा सामना करावा लागला. दिल्लीकडून खेळताना कोहलीकडून अपेक्षा होत्या की तो रणजी ट्रॉफीमध्ये रेल्वेविरुद्ध फॉर्ममध्ये परत येईल. पण इथेही त्यांचा संघर्ष सुरूच राहिला. रेल्वे विरुद्ध पहिल्या डावात विराटला केवळ १५ चेंडूंचा सामना करता आला. त्यामध्ये त्याने फक्त ६ धावा केल्या. यानंतर वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानने त्याला बाद केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहली प्रत्येक डावात ऑफ-साइड चेंडूवर एज लागल्याने स्लिपमध्ये बाद होत होता. पण या डावात तो थेट क्लीन बोल्ड झाला. त्याचा ऑफ स्टंप उडाला आणि कोलांटी उडी मारून लांब गेला. पाहा व्हिडीओ-
केएल राहुलनेही केली निराशा
हरवलेला फॉर्म शोधण्यासाठी विराट प्रमाणेच काल केएल राहुल देखील रणजीच्या मैदानात उतरला होता. परंतु केएल राहुलने देखील निराश केले. राहुल ५ वर्षांनंतर रणजी खेळायला आला. राहुलने मयंक सोबत ५३ धावांची भागीदारी केली पण राहुलला स्वत:साठी फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. केएल राहुलने ३७ चेंडू खेळले. त्यापैकी २४ चेंडूंवर एकही धाव निघाली नाही. अखेर ४ चौकारांसह एकूण २६ धावांची खेळी करून तो माघारी परतला.