Join us

'विराट कोहलीने पाकिस्तानमध्ये येऊन क्रिकेट खेळावं'

बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 17:42 IST

Open in App

मुंबई : सध्याच्या घडीला पाकिस्तानमधील सुरक्षेचा मुद्दा सर्वत्र गाजतो आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानमध्ये श्रीलंकेचा संघ क्रिकेट खेळत आहे. पण दुसरीकडे बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. आता तर भारताचा कर्णधार विराट कोहलीला पाकिस्तानमध्ये येऊन क्रिकेट खेळण्याची विनंती केली जात आहे.

सध्याच्या घडीला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना पुण्यामध्ये सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 3 बाद 273 अशी मजल मारली आहे. भारताच्या या धावसंख्येमध्ये विराटच्या नाबाद अर्धशतकाचाही समावेश आहे.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये काल ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका संपली. ही मालिका श्रीलंकेने 3-0 अशी जिंकली. या मालिकेमध्ये पाकिस्तानच्या एका चाहत्याने एक फलक आणला होता. या फलकावर चाहत्याने विराटसाठी एक खास संदेश लिहिला होता. हा संदेश आता ट्विटरवरही पाहायला मिळतो आहे.

या फलकावर लिहिले होते की, " विराट कोहली तू पाकिस्तानमध्ये येशील आणि क्रिकेट खेळशील, अशी आम्हाला आशा आहे. आम्ही तुझ्यावर भरपूर प्रेम करतो. मी तुझा सर्वात मोठा चाहता आहे. तुला, पाकिस्तानकडून भरपूर सारं प्रेम."

कराची नॅशनल स्टेडियमवर सोमवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळवण्यात आला. 2009नंतर प्रथमच या स्टेडियमवर झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्याला प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती असेल, असा अंदाज बांधला जात होता. पण, प्रत्यक्ष चित्र हे धक्कादायक होते. पाकिस्तान संघाने हा सामना 67 धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान दोनवेळा वीज गेली, त्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला. पाकिस्तानच्या या आयोजनावरून चाहत्यांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली. 

टॅग्स :विराट कोहलीपाकिस्तान