Virat Kohli on BCCI Rules : चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली 15 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोटात सामील झाला. याच दिवशी फ्रँचायझीने पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्स येथे ‘इनोव्हेशन लॅब इंडियन स्पोर्ट्स समिट’ नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी विराटने सीरिजदरम्यान आपल्या कुटुंबीयांना खेळाडूंपासून दूर ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. IPL 2025 सुरू होण्यापूर्वी त्याने बीसीसीआयच्या या नियमावर संतापही व्यक्त केला.
काय म्हणाला कोहली?विराट कोहलीने या दौऱ्यात आपल्या कुटुंबाची उपस्थिती मर्यादित केल्याबद्दल आणि खराब कामगिरीसाठी त्यांना जबाबदार धरल्याबद्दल निराशा व्यक्त केली. तो म्हणाला, कुटुंबातील सदस्यांचा खराब कामगिरीशी काहीही संबंध नाही, उलट त्यांच्या उपस्थितीमुळे कामगिरी सुधारण्यास नक्कीच मदत होते.
जेव्हा मैदानावर काही गंभीर घडते, तेव्हा कुटुंबात परतणे किती महत्त्वाचे असते, हे लोकांना समजावून सांगणे खूप कठीण आहे. मला वाटत नाही की, हे किती महत्त्वाचे आहे, हे त्या लोकांना समजेल. विराट पुढे म्हणाला, तुम्ही कोणत्याही खेळाडूला विचाराल, तुमचे कुटुंब नेहमी तुमच्या आसपास असावे असे तुम्हाला वाटते का? ते होच म्हणतील, अशी प्रतिक्रिया कोहलीने दिली.
काय आहे BCCI चा नियम ?टीम इंडियाला गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलियात सलग दोन मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाची कामगिरी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही अत्यंत खराब झाली होती. विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मासह अनेक खेळाडू वाईटरित्या फ्लॉप ठरले होते. यानंतर बीसीसीआयने कठोर प्रवास धोरण जाहीर केले आणि परदेशी दौऱ्यांमध्ये खेळाडूंच्या कुटुंबीयांची उपस्थिती मर्यादित केली. नियमानुसार आता जोडीदार आणि खेळाडूंची मुले दोन आठवड्यांसाठी प्रत्येक मालिकेत एकदाच येऊ शकतात. यामुळे कोहली आणि रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे. पूर्वी असे कोणतेही बंधन नव्हते.