Join us  

दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीला नामांकन

आयसीसी; दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन याचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 1:57 AM

Open in App

दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि दिग्गज ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन यांना आयसीसीने दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. आयसीसीच्या या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोहलीला सर्व पाच पुरुष गटांमध्ये नामांकन मिळाले आहे, हे विशेष. सर्वोत्तम खेळाडूसाठी कोहली आणि अश्विनसह एकूण ७ खेळाडूंना नामांकित करण्यात आले आहे. यामध्ये कोहली, अश्विन यांच्याव्यतिरिक्त जो रुट (इंग्लंड), केन विलियम्सन (न्यूझीलंड), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया), एबी डीव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) आणि कुमार संगकारा (श्रीलंका) यांचा समावेश आहे.

दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कारासाठी कोहलीसह माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि ‘हिटमॅन’ रोहित शर्मा यांनाही नामांकन मिळाले आहे. त्याचबरोबर लसिथ मलिंगा (श्रीलंका), मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), डीव्हिलियर्स आणि संगकारा हेही या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. दशकातील सर्वोत्तम टी-२० आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठीही कोहली आणि रोहित यांना नामांकन मिळाले असून यामध्ये राशिद खान (अफगाणिस्तान), इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका), अ‍ॅरोन फिंच (ऑस्ट्रेलिया), मलिंगा आणि ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) या स्टार क्रिकेटपटूंनाही नामांकन मिळाले आहे. खेळाडूंना मिळणाऱ्या मतांनुसार प्रत्येक गटातील अंतिम विजेता ठरविण्यात येईल. त्यासाठीच आता कोणते खेळाडू बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे.

n दशकातील सर्वोत्तम पुरुष कसोटीपटू आणि दशकातील आयसीसी क्रिकेट भावना पुरस्कारासाठीही कोहलीला नामांकन मिळाले आहे. क्रिकेट भावना पुरस्कारामध्ये कोहलीसह महेंद्रसिंग धोनीलाही नामांकन मिळाले आहे.n क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५० हून अधिकच्या सरासरीने धावा फटकावणाऱ्या कोहलीने आतापर्यंत ७० आंतरराष्ट्रीय शतके झळकावली असून त्याच्यापुढे केवळ रिकी पाँटिंग (७१) आणि सचिन तेंडुलकर (१००) हेच आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा काढणाऱ्यांमध्येही कोहली २१,४४४ धावांसह तिसऱ्या स्थानी असून त्याच्यापुढे पाँटिंग (२७,४८३) आणि सचिन (३४,३५७) आहेत.n गेल्या दशकामध्ये कोहलीने कसोटीमध्ये ७ हजारांहून अधिक, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ११ हजारांहून अधिक धावांची नोंद आहे. टी-२० क्रिकेटमध्ये कोहलीने २६०० हून अधिक धावा केल्या आहेत.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ