Join us  

ICC Awards: विराट कोहलीची हॅटट्रिक हुकली, इंग्लंडच्या खेळाडूनं बाजी मारली

2019मधील वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार टीम इंडियाचा हिटमॅन रोहीत शर्मानं पटकावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 12:32 PM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) 2019च्या वर्षाच्या पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. 2019मधील वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार टीम इंडियाचा हिटमॅन रोहीत शर्मानं पटकावला. आयसीसीनं जाहीर केलेल्या वन डे आणि कसोटी संघाचे नेतृत्व टीम इंडियाच्या विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. पण, विराटला एका पुरस्काराची हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी साधता आली नाही. इंग्लंडच्या बेन स्टोक्सनं त्याच्या या मार्गात खोडा घातला.

ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेननं 2019च्या सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार जिंकला. लाबुशेननं 2019मध्ये कसोटीत पदार्पण केले आणि त्यानं 11 कसोटी सामन्यांत 64.94च्या सरासरीनं 1104 धावा केल्या. भारताच्या दीपक चहरनं 2019मध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार पटकावला. त्यानं बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात हॅटट्रिकसह 7 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या. 

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यना स्टीव्ह स्मिथवर टीका करणाऱ्या प्रेक्षकांना सज्जड दम भरला होता. त्याच्या या कृतीला सर्वाधिक पसंती मिळाली होती आणि आयसीसीनं या कृतीला स्पिरीट ऑफ क्रिकेट या पुरस्कारानं गौरविले. रोहितनं यंदाच्या वर्षात वर्ल्ड कप स्पर्धेतील 5 शतकांसह एकूण 7 शतकी खेळी केल्या. त्यानं वन डे क्रिकेटमध्ये 2019मध्ये 28 सामन्यांत 57.30च्या सरासरीनं 1490 धावा केल्या. या शिवाय पॅट कमिन्सनं कसोटीतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. त्यानं 2019मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 59 विकेट्स घेतल्या. 

यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार बेन स्टोक्सनं नावावर केला. स्टोक्सनं यंदाचं वर्ष खऱ्या अर्थानं गाजवलं. इंग्लंडला वन डे वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या स्टोक्सनं कसोटीतही आपला दबदबा राखला. अॅशेस मालिकेतील त्याची चिवट खेळी अविस्मरणीय ठरली. त्यामुळे त्याला यंदाची सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी देण्यात आली. त्यामुळे विराटला सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकण्यापासून वंचित रहावे लागले. विराटनं 2017 व 2018मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती.

सर गॅरी सोबर्स ट्रॉफीचे मानकरी2004 - राहुल द्रविड2005 - जॅक कॅलिस व अँड्य्रू फ्लिंटॉफ2006 - रिकी पाँटिंग 2007 - रिकी पाँटिंग2008 - शिवनारायण चंद्रपॉल2009 - मिचेल जॉन्सन2010 - सचिन तेंडुलकर2011- जॉनथन ट्रॉट2012 - कुमार संगकारा2013 - मिचेल क्लार्क2014 - मिचेल जॉन्सन2015 - स्टीव्ह स्मिथ 2016 - आर अश्विन2017 - विराट कोहली2018 - विराट कोहली2019 - बेन स्टोक्स 

टॅग्स :आयसीसीविराट कोहलीबेन स्टोक्सरोहित शर्मा