Join us  

India vs South Africa 3rd Test: पहिली कसोटी हारल्यावर पुढचे दोन सामने कसे काय जिंकले? आफ्रिकन कर्णधाराने सांगितलं 'सिक्रेट'

मालिकेत भारत १-०ने आघाडीवर होता, पण आफ्रिकेने पुढच्या दोन्ही कसोटी जिंकून मालिका खिशात घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 6:30 PM

Open in App

IND vs SA 3rd test: भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना जिंकून १-०ची आघाडी घेतली होती. पण पुढील दोन्ही सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेने २-१ अशी मालिका जिंकली. या मालिकाविजयामागचं नक्की गुपित काय असा प्रश्न अनेकांना पडला. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याचं उत्तर दिलं.

"भारतावरील आमचा हा विजय खूपच आनंददायी आहे. या विजयाचा आनंद दीर्घकाळ राहिल. भारतासारख्या तुल्यबळ संघाला पराभूत करणाऱ्या आफ्रिकन संघाचा मला अभिमान आहे. सर्वच खेळाडूंनी उत्तम खेळ केला. आम्ही जेव्हा पहिली कसोटी गमावली त्यावेळीही मला विश्वास होता की आम्ही ही मालिका नक्की जिंकू शकतो. पुढील दोन सामन्यात मी आमच्या संघातील खेळाडूंना शांत आणि संयमी खेळ करण्याचा सल्ला दिला होता आणि त्यांनी दमदार खेळी करून दाखवली. शेवटच्या दोन कसोटी सामन्यात आम्ही एस संघ म्हणून खेळलो. एकत्रित प्रयत्नांनी काय घडू शकतं याची प्रचितीच आम्हाला आली आणि त्यामुळेच मी खूप आनंदी आहे", असं या मालिका विजयामागचं कारण कर्णधार डीन एल्गरने सांगितलं. म्हणाला.

"तुमच्या संघातील खेळाडूंना आव्हान देण्यासाठी त्यांनी तशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं असतं. आमच्या गोलंदाजांनी जी कामगिरी संपूर्ण कसोटी मालिकेत केली त्याबद्दल मी खुश आहे. मी पहिल्या कसोटीनंतर माझ्या संघातील खेळाडूंना सांगितलं होतं की सगळ्यांना उत्तम खेळ करावा लागेल. सर्वच खेळाडूंनी त्यानुसार कामगिरी करून दाखवली", एल्गर म्हणाला.

"मला नव्या दमाच्या युवा संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आमचा संघ हळूहळू अनुभवातून शिकत आहे. संघात मोठी नावं नसताना तुल्यबळ संघाला पराभूत करण्याचा पराक्रम करणं खूपच आनंददायी आहे. आमच्या विजयामुळे मला आता खूप सकारात्मकता मिळाली आहे. याच सकारात्मकतेतून पुढील क्रिकेट मालिका खेळण्याकडे आमचा कल असेल", असंही एल्गरने स्पष्ट केलं.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीजसप्रित बुमराहचेतेश्वर पुजारा
Open in App