Join us

IND vs NZ : सामन्यात विजयी लक्ष्य गाठण्याचे कौशल्य विराट कोहलीकडून शिकतो- श्रेयस अय्यर

टी-२० सामन्यात श्रेयसने आधी अर्धशतक आणि आज ३३ चेंडूत ४४ धावांचे योगदान दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 06:32 IST

Open in App

आॅकलंड : पांढऱ्या चेंडूच्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करण्यात कोहलीचा विशेष हातखंडा आहे. कर्णधाराकडून हे कौशल्य आत्मसात करण्याचे काम सध्या चौथ्या स्थानावरील फलंदाज श्रेयस अय्यर करीत आहे. या दौ-यात पहिल्या दोन्ही सामन्यात धावांचा पाठलाग करण्याचे काम मी केले. यात विराटची मोलाची मदत मिळाल्याचे मत श्रेयसने व्यक्त केले.

टी-२० सामन्यात श्रेयसने आधी अर्धशतक आणि आज ३३ चेंडूत ४४ धावांचे योगदान दिले. अय्यर हा विराटनंतर मॅचविनर म्हणून पर्याय ठरला. सामना संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अय्यर म्हणाला,‘नेमक्या किती धावांचा पाठलाग करायचा आहे याचा वेध घेतला की धावांची गती कशी राखायची याबद्दल डोक्यात समीकरण असते. विराट फलंदाजीला जाताना स्वत:च्या डोक्यात योजना आखतो. त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवून मी हे कौशल्य आत्मसात केले आहे. मॅचफिनिशर बनण्याची माझी तयारी आहे.’

मुंबईचा सिनियर सहकारी रोहित शर्मा याच्याकडून देखील बरेच काही शिकायला मिळाल्याचे सांगून अय्यर म्हणाला,‘ जेव्हा संधी मिळते तेव्हा मी भरपूर लाभ घेतो. संघातील ज्येष्ठ खेळाडू आमच्या युवा खेळाडूंसाठी फरफेक्ट उदाहरण आहेत. आम्हाला बरेच काही शिकायला मिळते. मी नाबाद राहून सामना जिंकण्यावर भर देतो. गोलंदाजांचा आक्रमकपणा लक्षात आल्यानंतर मी त्यांच्यावर तुटून पडतो. लक्ष्याचा पाठलाग करताना खेळण्यात मला अधिक आनंद येतो.’(वृत्तसंस्था)

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंड