India vs England Test Series : भारत-इंग्लंड यांच्यातली कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. भारताने पहिल्या कसोटीतील पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात चांगले पुनरागमन केले आणि मालिका बरोबरीत आणली. पण, मधल्या फळीतील फलंदाजाला साजेशी कामगिरी करता न आल्याने विराट कोहलीच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, पण त्याच्या बाबत मोठे अपडेट्स समोर येत आहेत. विराटने जानेवारी २०२४ मध्ये शेवटचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
२२ जानेवारीला इंग्लंड मालिका सुरू होण्याच्या तीन दिवस आधी विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटीतून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याचे बीसीसीआयने जाहीर केले होते. भारतीय संघात सामील होण्यासाठी हैदराबादला पोहोचला होता, पण तो माघारी परतला. त्यानंतर बीसीसीआयने कोहलीच्या अनुपस्थितीबद्दल आणखी कोणतेही अपडेट्स दिलेले नाहीत. बीसीसीआयने तेव्हा म्हटले होते की, "विराटने कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवड समिती सदस्यांशी चर्चा केली आहे. ज्यात त्याने यावर जोर दिला आहे की देशाचे प्रतिनिधित्व करणे याला नेहमीच त्याने सर्वोच्च प्राधान्य आहे, परंतु विशिष्ट वैयक्तिक कारणामुळे त्याला माघार घ्यावी लागत आहे.''
दुसऱ्या कसोटीला मुकलेल्या खेळाडूंपैकी मोहम्मद सिराज विश्रांतीनंतर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. लोकेश राहुल आणि पहिल्या कसोटीत हॅमस्ट्रिंगला दुखापत झालेल्या रवींद्र जडेजा यांच्या फिटनेसवर बंगळुरूमधील एनसीएमध्ये लक्ष ठेवले जात आहे. ESPNcricinfoला मिळालेल्या माहितीनुसार NCA फिजिओकडून अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे, परंतु दोन्ही खेळाडूंचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. तिसरी कसोटी आणखी आठवडाभर सुरू होणार नसल्यामुळे, फिटनेस क्लिअरन्स प्रलंबित असलेल्या राहुल आणि जडेजा यांच्यापैकी किमान एक खेळण्यासाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीत राहुल आणि जडेजा यांची शतके हुकली होती.
मालिकेतील विराट कोहलीची ( Virat Kohli) अनुपस्थिती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताचा सीनियर फंलंदाज अनुक्रमे राजकोट आणि रांची येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता बळावली आहे. क्रिकइन्फोला मिळालेल्या माहितीनुसार ६ मार्चपासून सुरू होणाऱ्या धर्मशाला येथील पाचव्या कसोटीसाठी कोहलीच्या उपलब्धतेबाबतची शंका कायम आहे.
विराट व अनुष्का शर्मा दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याचे वृत्त एबी डिव्हिलियर्सने दिले होते. त्यामुळेच विराटने मालिकेतून माघार घेतल्याची चर्चा आहे. पण, या वृ्त्तालाही अद्याप क्रिकेटपटूकडून दुजोरा मिळालेला नाही.