Virat Kohli Ranji Trophy : विराट कोहलीचे १३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणे खूप खास असणार आहे. विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या होम टीम दिल्लीकडून खेळणार आहे. यासाठी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने (डीडीसीए) विशेष तयारी केली आहे. DDCA 10 हजार चाहत्यांची आसन व्यवस्था केली आहे. मोठ्या संख्येने चाहते सामना पाहायला येण्याची शक्यता आहे. तशातच भारतीय क्रिकेटचा 'सुपरस्टार' विराटसाठी जिओ सिनेमानेही (Jio Cinema) रातोरात एक मोठा निर्णय घेतला आहे.
जिओ सिनेमाचा महत्त्वाचा निर्णय
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वे आणि दिल्ली यांच्यातील रणजी सामना लाईव्ह दाखवायचा कोणताही प्लॅन नव्हता. डीडीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बीसीसीआयने आधी तीन सामने प्रसारित करण्याचा निर्णय घेतला होता. कर्नाटक विरुद्ध हरयाणा, बंगाल विरुद्ध पंजाब आणि जम्मू-काश्मीर विरुद्ध बडोदा हे तीन सामने प्रसारित केले जाणार होते. पण कोहलीची ही क्रेझ लक्षात घेऊन आता जिओ सिनेमाने मोठा निर्णय घेतला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांना जिओ सिनेमावर विराट कोहलीच्या फलंदाजीसह या सामन्याचा आनंद घेता येणार आहे.
विराटचा दिल्लीच्या खेळाडूंसोबत सराव, धमाल-मस्ती
विराट कोहलीचा मुंबईत फलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये विराट टीम इंडियाचे माजी बॅटिंग कोच संजय बांगरसोबत दिसला होता. पण आता दिल्लीत त्याच्या रणजी संघात सामील झाल्यानंतर तो स्टेडियममध्ये खेळाडूंसोबत मस्ती करताना दिसला. दिल्लीच्या खेळाडूंसोबत तो फुटबॉल खेळला. हे नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
विराट कोहली १३ वर्षांनंतर रणजी खेळणार
रणजी करंडक स्पर्धेच्या दुस-या टप्प्यात दिल्लीने आपला पहिला सामना २३ जानेवारीपासून सौराष्ट्रविरुद्ध खेळला. या सामन्यात कोहली खेळणार होता, पण त्याला मानेला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर बसला. आता दिल्लीच्या शेवटच्या साखळी सामन्यात रेल्वे विरुद्ध खेळणार आहे. हा सामना ३० जानेवारीपासून सुरू होणार आहे. यासह विराट १३ वर्षांनंतर रणजीमध्ये पुनरागमन करणार आहे. याद्वारे कोहली आपल्या खराब फॉर्ममधून बाहेर परतण्याचा प्रयत्न करेल.