ऑकलंड : भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. सोमवारी झालेल्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारताने सात विकेट राखून विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतील आहे. उर्वरित दोन सामने आणि ट्वेंटी-20 मालिकेत कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे तो पत्नी अनुष्का शर्मासोबत सुट्टीवर गेला आहे.
अनुष्का संपूर्ण न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघासोबत होती. कोहली व अनुष्का मंगळवारी एका खाजगी विमानाने फिरायला गेले. कोहलीने दोघांचा फोटो ट्विट केला.
2009नंतर भारताने न्यूझीलंडमध्ये प्रथमच वन डे मालिका जिंकली आहे. महेंद्रसिंग धोनीनंतर न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकणारा कोहली हा भारताचा दुसरा कर्णधार ठरला आहे. भारतीय संघाने मालिकेतील तीनही सामन्यांत वर्चस्व गाजवले. पहिल्या सामना भारताने डकवर्थ लुईस प्रणालीनुसार 8 विकेटने जिंकला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 90 धावांनी विजय मिळवला. सोमवारी झालेल्या सामन्यात भारताने 7 विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.