इंडियन प्रीमिअर लीगच्या १७व्या पर्वाला दोन दिवसांनी सुरुवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्घाटनीय लढत होणार आहे. काल बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB चा मोठा सोहळा पार पडला. महिला प्रीमिअर लीगचे ( WPL 2024) जेतेपद पटकावणाऱ्या RCB च्या महिला संघाचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी विराट कोहलीला ( Virat Kohli) पाहण्यासाठी चाहत्यांनी तौबा गर्दी केली होती आणि मोठ्या स्क्रीनवर विराट दिसताच 'किंग कोहली' नारा दुमदुमला... चाहत्यांचं प्रेम पाहून विराटही भारावला, परंतु त्याने त्यांना एक आवाहन केलं...
वन डे वर्ल्ड कप २०२३ नंतर विराट कोहली क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पत्नी अनुष्का शर्माच्या दुसऱ्या बाळंतपणासाठी विराट लंडनला गेला होता. त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही माघार घेतली होती. आता तो थेट आयपीएल २०२४ मध्ये आरसीबीकडून फटकेबाजी करायला मैदानावर उतरणार आहे. WPL मध्ये आरसीबीने जसे जेतेपद जिंकले, तसेच यावेळेस आयपीएलमध्ये हा संघ बाजी मारेल, अशी चाहत्यांना आशा आहे.
काल आरसीबीने मोठा इव्हेंट केला आणि त्यात RCBचे नवे नाव व लोगो जाहीर करण्यात आला. यावेळी विराटने चाहत्यांना आवाहन केलं की, कृपया मला 'किंग' बोलू नका, मला लाजल्यासारखं वाटतं. ''आजच आम्हाला चेन्नईसाठी रवाना व्हायचं आहे. आमचं चार्टर्ड विमान उभं आहे, त्यामुळे आमच्याकडे पुरेसा वेळ नाही. पण, मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो की, सर्वप्रथम मला किंग बोलणं सोडा. कृपया मला विराटच बोला. मी आता फॅफ ड्यू प्लेसिसला हेच सांगत होतो की जेव्हा तुम्ही मला किंग बोलावता तेव्हा लाजल्यासारखं वाटतं. त्यामुळे मला विराट म्हणून हाक मारा, आजपासून मला किंग बोलणं सोडा,''असे विराट म्हणाला.
IPL 2024 मधील RCB चे वेळापत्रक - २२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
- २५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
- २९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
- २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
- ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर