Virat Kohli, Ranji Trophy : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात खराब कामगिरी केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सर्व खेळाडूंना रणजी सामने खेळण्याचे आदेश दिले. बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी १० कठोर नियम बनवले. त्यापैकी एक म्हणजे टीम इंडियाच्या खेळाडूंना रिकाम्या वेळेत देशांतर्गत क्रिकेट खेळावेच लागेल. त्यामुळेच रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंत सर्वच खेळाडूंनी आपल्या घरच्या संघाकडून रणजी क्रिकेट खेळले. रोहित पाठोपाठ विराटही रणजीमध्ये फ्लॉप ठरला. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी विराटबाबत मोठा खुलासा केला आहे.
दिल्लीच्या मुख्य प्रशिक्षकाचा खुलासा
दिल्ली आणि रेल्वे यांच्यात खेळल्या गेलेल्या रणजी सामन्यात विराट कोहली जवळपास १३ वर्षानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना झाला. यावेळी कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. सामन्याच्या पहिल्याच दिवशी जवळपास १२ हजार चाहते सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर आले होते. या सामन्याने सोशल मीडियावरही बरीच हवा केली, पण विराट फलंदाज म्हणून फ्लॉप ठरला. या सामन्यात त्याला फक्त एकदाच फलंदाजीची संधी मिळाली आणि तो १५ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. याचदरम्यान, दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी खुलासा केला आहे की कोहलीने येत्या काही वर्षांत दिल्लीकडून खेळायची इच्छा व्यक्त केली आहे. याचाच अर्थ विराट भविष्यात देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसेल.
विराट कसा झाला बाद?
सरनदीप सिंग यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले की, तो निश्चितच खूप चांगला खेळाडू आहे. विराटला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो नक्कीच खेळेल. त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळायला आवडते आणि खेळण्याची इच्छा आहे. पण तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सतत खेळतो. ते वेळापत्रक खूप व्यस्त असते आणि प्रवास थकवा आणणारा असतात. काही वेळा दोन्ही सामने समान वेळेत असतात तर काही वेळा खेळाडूंनाही विश्रांतीची गरज असते. पण तसे असले तरीही तो जमेल तेव्हा दिल्ली संघाकडून खेळणार असल्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत दिसणार विराट
विराट कोहली सध्या नागपुरात पोहोचला आहे. तो भारताच्या इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा भाग आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या तयारीसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या मालिकेनंतर लगेचच टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला जायचे आहे.
Web Title: Virat Kohli flops in Ranji comeback but demands to play more matches in future from Delhi team said coach
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.