स्टार फलंदाज विराट कोहलीने भारतीय संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबद्दल चार वर्षांनंतर आपले मौन सोडले. त्याने जवळपास एक दशक भारतीय संघ आणि आयपीएल फ्रँचायझी आरसीबीचे नेतृत्व केले. कोहलीने सर्वात प्रथम २०२१ मध्ये भारतीय टी-२० संघ आणि त्यानंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडले. यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरूनही काढून टाकले. काही महिन्यांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर कोहलीनेही कसोटी कर्णधारपद सोडले. परंतु, विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय का घेतला? हे आतापर्यंत कोणालाही माहिती नव्हते. पण आता कोहलीने स्वतः हे गुपित उघड केले.
आरसीबी बोल्ड डायरीज पॉडकास्टमध्ये मयंती लँगरशी बोलताना विराट म्हणाला की, 'माझ्यासाठी कर्णधारपद खूप कठीण झाले. माझ्या कारकिर्दीत मी अशा टप्प्यावर पोहोचलो होतो की, मला क्रिकेटवरह लक्ष केंद्रित करता येत नव्हते. मला खूप संघर्ष करावा लागला. मी नेहमी त्याचाच विचार करायचो. मी २०२२ मध्ये एक महिन्याचा ब्रेक घेतला आणि या काळात बॅटला हातही लावला नाही. त्यावेळी मला असे वाटू लागले की, खेळात स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठी आनंदी राहणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर मी कर्णधारपदातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.'
आरसीबी बोल्ड डायरीज पॉडकास्टमध्ये बोलताना विराट कोहलीने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचेही नावही घेतले. कोहली म्हणाला की, धोनी आणि गॅरी कर्स्टन यांनी त्याला भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आत्मविश्वास वाढवला. अनेक मोठ्या आणि दिग्गज क्रिकेटपटूंना खेळताना पाहिले. त्याला वाटले नव्हते की, दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना केली जाईल. पण धोनी आणि कर्स्टन यांनी त्याला खात्री दिली की, त्याचे तिसऱ्या क्रमांकाचे स्थान निश्चित आहे.