All Time Champions IPL XI, Adam Gilchrist: भारतात सध्या IPL ची धूम सुरु आहे. भारत पाकिस्तान तणाव आणि ऑपरेशन सिंदूरनंतर स्पर्धेला काही दिवसांसाठी स्थगिती देण्यात आली होती. पण आता १७ मे पासून या स्पर्धेला पुन्हा सुरुवात होत आहे. पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे २५ मे रोजी स्पर्धा संपणार होती. पण नव्या वेळापत्रकानुसार, ३ जूनला स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. यंदाच्या वर्षी बंगळुरू, मुंबई, गुजरात आणि पंजाब या चार संघांना प्लेऑफचे तिकीट मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे. पण अद्याप निर्णय झालेला नाही. याचदरम्यान, डेक्कन चार्जर्सला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार अडम गिलख्रिस्ट याने त्याचा सर्वकालीन सर्वोत्तम चॅम्पियन्स IPL संघ निवडला आहे. त्यात त्याने विराट कोहलीला (Virat Kohli) वगळले आहे. मुंबई इंडियन्सच्या ५ खेळाडूंना स्थान दिले आहे. तर कर्णधारपदासाठीही अनुभवी चेहरा निवडला आहे.
गिलख्रिस्टच्या संघात फलंदाज कोण? ग्रिलख्रिस्टने निवडलेल्या संघात डेव्हिड वॉर्नर आणि रोहित शर्मा यांना सलामीवीर ठेवण्यात आले आहे. सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू म्हणून वॉर्नरला संघात स्थान दिले आहे. तिसऱ्या क्रमांकावर Mr. IPL सुरेश रैनाला समाविष्ट करण्यात आले आहे. त्याने CSKला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचे फलंदाज आहेत. चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादवला तर पाचव्यासाठी किरॉन पोलार्डला पसंती देण्यात आली आहे.
कर्णधार कोण?
संघात रोहित शर्मा असला तरीही गिलख्रिस्टने कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीचीच निवड केली आहे. धोनी उत्तम फिनिशर असल्याने त्याला सहाव्या क्रमांकावर संघात घेण्यात आले आहे. त्यापाठोपाठ सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून रविंद्र जाडेजा यालाही संघात स्थान दिले गेले आहे. याशिवाय मिस्ट्री स्पिनर सुनील नरेन याला आठव्या क्रमांकावर संघात घेण्यात आले आहे.
गोलंदाजीला कोण-कोण?
गिलख्रिस्टने निवडलेल्या संघात नवव्या क्रमांकावर मुंबईचा यॉर्कर किंग लसिथ मलिंगा याला स्थान देण्यात आले आहे. तर दहाव्या क्रमांकावर नवा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहला संघात संधी दिली गेली आहे. या दोन वेगवान गोलंदाजांसोबतच स्विंगचा मास्टर अशी ओळख असणाऱ्या भुवनेश्वर कुमारला संघात ११व्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे.
गिलख्रिस्टने निवडलेला All Time IPL XI संघ- डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जाडेजा, सुनील नरेन, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार