Join us  

आयसीसी क्रमवारीत 'विराट' राज्य; वन डे अन् कसोटीत गाजवलं अधिराज्य

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) सोमवारी जागतिक कसोटी क्रमवारी जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 3:30 PM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) सोमवारी जागतिक कसोटी क्रमवारी जाहीर केली. कसोटी फलंदाजांत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यांच्यात कडवी चुरस पाहायला मिळाली. मात्र, वर्षाखेरीस विराटनं बाजी मारली. कसोटीतच नव्हे तर वनडे फलंदाजांतही विराट अव्वल स्थानी कायम राहिला.  

विराटनं या वर्षांत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातली. वर्ल्ड कप स्पर्धेत सलग अर्धशतकं, वेस्ट इंडिजविरुद्ध सलग दोन शतकं आणि काही मॅच विनींग खेळी, शिवाय कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधिक द्विशतकांचा विक्रमही त्यानं नावावर केला. डे  नाईट कसोटीत शतक झळकावणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान त्यानं पटकावला. वर्षाखेरीस त्यानं कसोटी व वन डे फलंदाजांत अव्वल स्थान कायम राखले आहे. अॅशेस मालिका गाजवणाऱ्या स्मिथला त्यानंतर आलेले अपयश हे विराटच्या पथ्यावर पडले. 

कसोटीत 928 गुणांसह तो अव्वल स्थानी कायम आहे. स्मिथ 911 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( 864), भारताचा चेतेश्वर पुजारा ( 791) आणि ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुश्चॅग्ने ( 786) गुणांसह अव्वल पाचात आहेत. मार्नसनं सातत्यपूर्ण खेळ करताना तीन स्थानांच्या सुधारणेसह भरारी घेतली.  

वन डेतही विराट 895 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. रोहित शर्मा ( 863) दुसऱ्या, तर पाकिस्तानचा बाबर आझम ( 834) तिसऱ्या स्थानी आहे. ट्वेंटी-20त लोकेश राहुल सहाव्या ( 734), रोहित शर्मा (686) नवव्या आणि विराट कोहली ( 685) दहाव्या स्थानावर आहे.  

टॅग्स :आयसीसीविराट कोहलीस्टीव्हन स्मिथरोहित शर्मालोकेश राहुल