Virat Kohli Net Practice at Lord's, IND vs AUS: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. कोहलीने IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसलेला नाही. पण टी२० आणि कसोटीतून निवृत्त झालेला कोहली आता मात्र पुन्हा एकदा मैदानात घाम गाळताना दिसतोय.
यावर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात होणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत तो सहभागी होण्याची शक्यता आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये खेळला जाईल. त्यानंतर उर्वरित दोन एकदिवसीय सामने २३ ऑक्टोबर (अडलेड) आणि २५ ऑक्टोबर (सिडनी) रोजी दोन्ही संघांमध्ये खेळले जातील. कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी सुरू केली असून लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर त्याचा जोरदार सराव सुरू आहे. विराट कोहलीने लॉर्ड्स क्रिकेट मैदानाबाहेर चाहत्यांसोबत फोटो काढले.
बीसीसीआयचे विराट-रोहितबद्दल मत काय?
अलिकडेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हे वृत्त फेटाळून लावले आहे. बीसीसीआयचे म्हणणे आहे की, खेळाडूने स्वतः त्याच्या भविष्याचा निर्णय घ्यावा. बोर्ड कधीही कोणत्याही खेळाडूला जबरदस्तीने निवृत्ती घेण्यास सांगत नाही.
फिट असेपर्यंत क्रिकेट खेळणार- विराट
आरसीबीचा युवा फलंदाज स्वस्तिक चिकाराने विराट कोहलीशी IPL दरम्यान गप्पा मारत होता. तेव्हा झालेला संवाद त्याने चाहत्यांसह शेअर केला आहे. चिकाराने रेव्हस्पोर्ट्झला सांगितले की, विराट भैय्याने मला सांगितले की तो पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत क्रिकेट खेळेल. तो इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळणार नाही. तो संपूर्ण २० षटके क्षेत्ररक्षण करेल आणि नंतर फलंदाजीसाठी येईल. ज्या दिवशी त्याला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळायची वेळ येईल, त्याच दिवशी तो क्रिकेट खेळणे थांबवेल.