यशस्वी पुरुषामागे स्त्री... विराटकडून RCBच्या पहिल्या विजयाचं श्रेय अनुष्काला
मुंबई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 2016च्या हंगामातील उपविजेत्या बंगळुरूला सलग सहा सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले. आयपीएलच्या प्ले ऑफ शर्यतीतून बाद होण्याचे सावट डोक्यावर असताना बंगळुरूने शनिवारी पहिल्या विजयाची चव चाखली. कर्णधार विराट कोहलीच्या संघाने किंग्स इलेव्हन पंजाबवर 8 विकेट राखून विजय मिळवला. कोहली ( 67) आणि एबी डिव्हिलियर्स ( 59*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरूने 174 धावांचे लक्ष्य 19.2 षटकांत पार केले.
या विजयानंतर पत्रकारपरिषदेत आलेल्या कोहलीनं आनंद व्यक्त केला. कोहलीनं या विजयाचे श्रेय एका खास व्यक्तीला दिले. आत्मविश्वास वाढवणाऱ्या तिच्या दोन शब्दांनी कोहलीवरील दडपण कमी केले आणि पुन्हा नव्या उत्साहात तो आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज झाला. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आहे. ''गेल्या वर्षी आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात एक चांगली घटना घडली आणि ती म्हणजे माझे लग्न... या घटनेने माझे आयुष्यच बदलले. माझ्या आयुष्यात एक सुंदर पत्नी आली, सुंदर व्यक्ती आली. तिच्यामुळे जीवनात बरीच सकारत्मकता आली. ती नेहमी मला प्रोत्साहन करत असते.''
कोहली आयपीएल आणि राष्ट्रीय कर्तव्यावर असताना अनुष्का नेहमी त्याच्यासोबत असते. कोहलीला प्रोत्साहन देताना अनेकदा तिला स्टेडियममध्ये पाहिले आहे. बंगळुरूला आज मुंबई इंडियन्सचा सामना करायचा आहे. मुंबईला धक्का देण्यासाठी खेळणार आरसीबीयंदाच्या सत्रातील पहिला विजय नोंदवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आता हीच लय कायम ठेवून सोमवारी मुंबई इंडियन्सला धक्का देण्याच्या इराद्याने वानखेडे स्टेडियमध्ये पाऊल ठेवेल. आरसीबी कोहली आणि एबी डिव्हिलियर्सवरच जास्त अवलंबून आहे. आता त्यांचे लक्ष मुंबईविरुद्धही गत सामन्याची पुनरावृत्ती करण्यावर असेल. वडील आयसीयूत दाखल असतानाही पार्थिव पटेलने 7 सामन्यांत 191 धावा केल्या. अक्षदीप नाथ, मोईन अली, मार्कस स्टोइनिस व कॉलिन डि ग्रांडहोमे यांच्याकडूनही भरीव कामगिरीची अपेक्षा असेल. गोलंदाजीत आरसीबीची सर्वात जमेची बाजू ११ बळी घेणारा युजवेंद्र चहल आहे. तो वानखेडेच्या संथ खेळपट्टीवर महत्त्वपूर्ण गोलंदाज ठरू शकतो.