आयपीएलच्या 11 व्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्याआधी कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या टीममधील खेळाडूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये विराट कोहली त्याचे संघातील सहकारी खेळाडू ब्रँडन मॅक्युलम आणि यजुर्वेंद्र चहालसोबत डान्स करताना दिसतो आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा खेळाडू यजुर्वेंद्र चहालने मंगळवारी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये विराट कोहली चहाल आणि मॅक्युलमसोबत नाचताना दिसतो आहे. मॅक्युलम पहिल्यांदाच आरसीबीच्या टीममधून आयपीएल खेळताना दिसणार आहे. याआधी मॅक्युलमने आयपीएलमध्ये दिल्ली आणि कोलकात्याचे प्रतिनिधित्व केले आहे. चहालने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली डान्स फ्लोअरवर काही स्टेप्स करताना दिसतो आहे. त्याच्या बाजूला चहाल आणि मॅक्युलमदेखील दिसत आहेत.
शनिवारपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होते आहे. आयपीएलच्या 11 व्या हंगामाची तयारी सध्या अतिशय जोरात सुरु आहे. त्यामुळेच विराट कोहलीने मंगळवारी नेट्समध्ये जोरदार सराव केला. त्याचे काही फोटो आरसीबीने ट्विटरवर शेअर केले होते. यामध्ये विराट कोहली फलंदाजीचा सराव करताना दिसत होता. आरसीबीला आतापर्यंत एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. आयपीएलच्या मागील हंगामात विराट कोहली अतिशय चांगल्या फॉर्मात होता. त्या स्पर्धेत त्याने विक्रमी चार शतके झळकावली. मात्र तरीही आरसीबीला स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले नाही. कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता तो संघाला यंदा जेतेपद पटकावून देईल, अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.