Join us

"विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज; प्रतिस्पर्ध्यालाच अडकवतो जाळ्यात"

भारतीय कर्णधाराचे प्रतिस्पर्धी वर्तन नेहमी आठवणीत राहील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 05:23 IST

Open in App

मेलबोर्न : भारतीय कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्याच शैलीत उत्तर देण्यास सक्षम आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने कोहलीची प्रशंसा केली.

पेनने २०१८-१९ मध्ये भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा उल्लेख करताना म्हटले की, भारतीय कर्णधाराचे प्रतिस्पर्धी वर्तन नेहमी आठवणीत राहील. या ३६ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाजाने माजी दिग्गज ॲडम गिलख्रिस्टच्या पोडकास्ट ‘गिली अँड गोस’मध्ये म्हटले की, ‘विराट कोहलीबाबत मी नेहमीच म्हटले आहे की, त्याचासारखा खेळाडू आपल्या संघात ठेवायला आवडेल. तो प्रतिस्पर्धी आहे. तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्याविरुद्ध खेळणे आव्हानात्मक आहे. तो तुमच्या योजनांमध्ये अडकत नाही. कारण त्याला खेळाचे चांगले ज्ञान आहे.’

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८-१९ मध्ये प्रथमच ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत पराभव केला होता. भारताने बॉर्डर-गावसकर मालिका २-१ ने जिंकली होती. या मालिकेदरम्यान उभय कर्णधारांदरम्यान अनेकदा शाब्दिक युद्ध अनुभवाला मिळाले होते.

टॅग्स :विराट कोहली