Join us  

विराट कोहली आणि निवड समितीला घेऊ द्या धोनीच्या निवृत्तीचा निर्णय, 'दादा'चा सल्ला

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा काही केल्या थांबत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:07 PM

Open in App

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा काही केल्या थांबत नाही. त्यात धोनी वारंवार विश्रांतीची विनंती करत असल्यानं या चर्चांना खतपाणी मिळत आहे. वेस्ट इंडिज आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही धोनीनं विश्रांती मागितली. निवड समितीनंही त्याची ही विनंती मान्य केली. त्यामुळे धोनी आता पुढील मालिकेत तरी खेळेल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे धोनीनं निवृत्त व्हावे, असाही एक मतप्रवाह निर्माण होत आहे. पण, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं धोनीच्या निवृत्तीचा निर्णय कर्णधार विराट कोहली व निवड समितीनं घ्यावा, असा सल्ला दिला आहे. 

इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्यानं निवृत्ती घ्यीव अशी मागणी जोर धरत होती. या स्पर्धेनंतर धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आणि 15 दिवस भारतीय सैनिकांसोबत त्यानं  जम्मू-काश्मीरमध्ये पहारा दिला. त्यानंतर मायदेशात होणाऱ्या आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही त्यानं विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. या कृतीमुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना वेग आला. 

त्यात कोहलीनं कॅप्टन कूलसोबतचा एक फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिल्यानंतर तर या चर्चांना वेग आला. पण, धोनीची पत्नी साक्षीनं ही अफवा असल्याचे स्पष्ट केले, तर निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनीही दिग्गज यष्टिरक्षक धोनीनं याबबात अद्याप काही कळवले नसल्याचे सांगून या चर्चांचा फुगा फोडला. भारत आणि दक्षिण आफ्रिके यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 मालिकेपूर्वीच्या पत्रकार परिषदेतही कोहलीनं त्या फोटोमागचा हेतू सांगितला. तो म्हणाला,''माझ्या मनात दूरदूर पर्यंत असा विचार नव्हता की धोनी निवृत्ती घेतोय. बस मला त्या सामन्याची आठवण झाली. त्यामुळे मी सहज तो फोटो शेअर केला. पण, लोकांनी त्याचा भलताच अर्थ लावला गेला.''  

गांगुली म्हणाला,'' निवड समिती, विराट कोहली काय विचार करत आहे, याची कल्पना नाही. धोनीच्या निवृत्तीचा निर्णय घेण्यात कोहली व निवड समिती यांचे मत महत्त्वाचे असणार आहे.''

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीसौरभ गांगुलीविराट कोहलीबीसीसीआय