Join us  

कोहली रहाणेची 'विराट' भागीदारी ! वनडे मालिकेत भारताची विजयी सलामी 

कसोटी मालिका गमावणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दणक्यात सुरुवात केली आहे.  कर्णधार विराट कोहली आणि  अजिंक्य रहाणेने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या 189 भागीदारीच्या जोरावर भारताने दर्बान येथे झालेल्या पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 12:04 AM

Open in App

दरबन - कसोटी मालिका गमावणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दणक्यात सुरुवात केली आहे.  कर्णधार विराट कोहली आणि  अजिंक्य रहाणेने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या 189 भागीदारीच्या जोरावर भारताने दर्बान येथे झालेल्या पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली. विराट कोहलीने  112  तर अजिंक्य रहाणेने 79 धावा फटकावत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयाबरोबरच भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शानदार शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीने सामनावीराचा मान पटकावला.

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 270 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र रोहित (20) आणि शिखर धवन (35) ठरावीक अंतराने बाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला होता. मात्र अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहली. आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताच्या फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेतली. वनडे कारकिर्दीतील 33वे शतक फटकावणारा विराट कोहली आणि 79 धावांची शानदार अर्धशतकी खेळी करणारा अजिंक्य रहाणे यांनी तिसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. रहाणे 79 धावा काढून तर विराट 112 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंग धोनीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.  तत्पूर्वी  पहिल्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर विजयासाठी 270 धावांचे आव्हान ठेवले. कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर यजमान संघाने निर्धारित 50 षटकांत आठ बाद 269 धावा फटकावल्या.  या सामन्यात द. आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. मात्र, फलंदाज हाशिम अमला या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि क्विंटन डी कॉक याने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. फाफ डु प्लेसिसने शानदार शतकी खेळी केली. फाफ डु प्लेसिसने 11 चौकार आणि दोन षटकार लगावत 111 चेंडूत 120 धावा केल्या. हाशिम अमलाने 17 चेंडूत 16 धावा केल्या तर क्विंटन डी कॉकने 34 धावा केल्या. जेपी ड्यूमिनी (12), एडेन मार्कराम (9), डेव्हिड मिलर (7), ख्रिस मॉरिस (37), रबाडा (1) आणि एंडिल फॅलुकवायो याने नाबाद 27 धावा केल्या. भारताकडून गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक जास्त  तीन बळी घेतले, तर युजवेंद्र चहलने दोन आणि जसप्रित बुमराह व भुवनेश्वर कुमारने एक बळी टिपला.  

धावफलक :दक्षिण आफ्रिका : क्विंटन डिकॉक पायचीत गो. चहल ३४, हाशिम आमला पायचीत गो. बुमराह १६, फाफ डू प्लेसिस झे. हार्दिक गो. भुवनेश्वर १२०, एडेन मार्करम झे. हार्दिक गो. चहल ९, जेपी ड्युमिनी त्रि. गो. कुलदीप १२, डेव्हिड मिल्लर झे. कोहली गो. कुलदीप ७, ख्रिस मॉरिस त्रि. गो. कुलदीप ३७, अँडिले फेहलुकवायो नाबाद २७, कागिसो रबाडा धावबाद (धोनी) १, मॉर्नी मॉर्केल नाबाद ०. अवांतर - ६. एकूण : ५० षटकात ८ बाद २६९ धावा.बाद क्रम : १-३०, २-८३, ३-१०३, ४-१२२, ५-१३४, ६-२०८, ७-२६४, ८-२६८.गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-१-७१-१; जसप्रीत बुमराह १०-०-५६-१; हार्दिक पांड्या ७-०-४१-०; युझवेंद्र चहल १०-०-४५-२; कुलदीप यादव १०-०-३४-३; केदार जाधव ३-०-१९-०.भारत : रोहित शर्मा झे. डीकॉक गो. मॉर्केल २०, शिखर धवन धावबाद (मार्करम) ३५, विराट कोहली झे. रबाडा गो. फेहलुकवायो ११२, अजिंक्य रहाणे झे. ताहिर गो. फेहलुकवायो ७९, हार्दिक पांड्या नाबाद ३, महेंद्रसिंग धोनी नाबाद ४. अवांतर - १७. एकूण : ४५.३ षटकात ४ बाद २७० धावा.बाद क्रम : १-३३, २-६७, ३-२५६, ४-२६२.गोलंदाजी : मॉर्नी मॉर्केल ७-०-३५-१; कागिसो रबाडा ९.३-०-४८-०; ख्रिस मॉरिस ७-०-५२-०; इम्रान ताहिर १०-०-५१-०; अँडिले फेहलुकवायो ८-०-४२-२; जेपी ड्युमिनी २-०-१६-०; एडेन मार्करम २-०-२०-०.

टॅग्स :क्रिकेटविराट कोहलीअजिंक्य रहाणेभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८