Join us  

विराट ४० चेंडूंत शतक झळकावू शकतो! सौरव गांगुलीने T20 WC संघासाठी सूचवले पाच खेळाडू 

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची घोषणा केव्हा केली जाईल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 6:18 PM

Open in App

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची घोषणा केव्हा केली जाईल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. विराट कोहलीची निवड, रिषभ पंतचे पुनरागमन, यष्टिरक्षक-फलंदाजाच्या शर्यतीत काँटे की टक्कर... अशा अनेक प्रश्नांची उत्तर मिळणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स (DC) चे क्रिकेट संचालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टीम इंडियाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये निर्भयपणे खेळण्याचा दृष्टीकोन अवलंबण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्याने स्टार फलंदाज विराट कोहलीकडे ४० चेंडूंत शतक झळकावण्याची क्षमता असल्याचे मत व्यक्त करताना त्याचे कौतुक केले. 

दिल्ली कॅपिटल्स सध्या तीन विजय आणि पाच पराभवानंतर सहा गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान बोलताना गांगुली म्हणाला, "भारतासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न घाबरता खेळणे. ट्वेंटी-२० क्रिकेट खेळण्यासाठी वय किंवा तरुण असा कोणताच नियम नाही. जेम्स अँडरसन अजूनही कसोटी खेळतो आणि कसोटीत ३० षटके टाकतो. महेंद्रसिंग धोनी अजूनही खणखणीत षटकार मारतो आणि दोघांनीही वयाची चाळीसी ओलांडली आहे.'' 

"भारतीय संघाने बाहेर जाऊन आक्रमक खेळ करणे महत्त्वाचे आहे. रोहित, विराट, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या इ. हे सर्व अपवादात्मक प्रतिभावान आहेत आणि त्यांची सिक्स मारण्याची क्षमता जबरदस्त आहे,'' असे तो पुढे म्हणाला. वेस्ट इंडिज व अमेरिका येथे १ जूपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होत आहे.

 "अनुभव आणि तरुणांचा समतोल असणं गरजेचं आहे. महान संघांबाबत असंच आहे. तुम्हाला सर्व  आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय अशी दोन्ही स्पर्धांमधील खेळाडूंची कामगिरी पाहावी लागेल. भारताच्या अनुभवी खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे ते वर्षानुवर्षे जबरदस्त आहेत," असे सांगून संघ निवडताना संतुलन राखणे महत्त्वाचे असल्याचे गांगुली म्हणाला. त्याने पुढे म्हटले, मला विचाराल तर रोहित शर्मा व विराट यांनी वर्ल्ड कपमध्ये सलामीला खेळायला हवे. विराटमध्ये ४० चेंडूंत शतक झळकावण्याची क्षमता आहे.  

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024सौरभ गांगुलीविराट कोहलीरोहित शर्मा