फाइन-डायनिंग रेस्टॉरंटमधील ग्राहकांनी विशिष्ट प्रकारच्या शिष्टाचारांचे पालन करणे अपेक्षित आहे. पण, "औपचारिक पोशाख" काय असावा, हे ठरवणे नेहमीच सोपे नसते. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने या विषयावर ऑनलाइन जोरदार चर्चा सुरू केली आहे. या व्हिडीओत तामिळनाडूतील एक माणसाने पारंपरिक पोशाख घातल्यामुळे त्याला विराट कोहलीच्या मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारल्याचा दावा केला आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो माणूस मुंबईतील जुहू येथील ONE 8 रेस्टॉरंटसमोर उभा असल्याचे दिसत आहे. रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी त्याने खास तमिळनाडूहून प्रवास केला होता, परंतु इथे आल्यावर तो निराश झाला. विराट कोहलीच्या मालकीच्या जुहू रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी तो तिथे उत्सुकतेने पोहोचला, परंतु धोती-कुर्ता घातल्यामुळे त्याला तेथील व्यवस्थापनाने प्रवेश नाकारला. त्यांच्या मते, त्या व्यक्तीचे कपडे आस्थापनाच्या आवश्यक ड्रेस कोडची पूर्तता करत नाहीत.
अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी अपेक्षा त्या व्यक्तिने व्यक्त केली. त्याने पुढे म्हटले की,"रंगीत लुंगी, थ्री फोर्त पॅन्ट किंवा कोणत्याही प्रकारचे कॅज्युअल पोशाख परिधान केल्याबद्दल प्रवेश नाकारला गेला असता, तर मी समजू शकत होतो. पण, माझ्या राज्याच्या संस्कृतीचा एक भाग असलेला पोशाख स्वीकारला नाही याबद्दल मी नाराज झालो.
X पोस्टला आतापर्यंत १.६ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. पण, त्याच्या या दाव्यावर भिन्न मतं व्यक्त होत आहेत. काहींनी अशा पद्धतींसाठी रेस्टॉरंटची निंदा केली आहे, तर काहींना वेगळे वाटते. काही लोकांचा असा विश्वास आहे की आस्थापनेचा ड्रेस कोड लागू करण्याचा अंतिम अधिकार आहे.