VINOO MANKAD TROPHY - विनू मांकड ट्रॉफी स्पर्धेतील आजच्या सामन्यात मुंबईच्या मुशीर खानने ( Musheer Khan) अष्टपैलू कामगिरी करून चंडिगढ संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. मुशीरने १० षटकांत ५७ धावा देताना २ विकेट्स घेतल्या आणि त्यात ३६ चेंडू निर्धाव फेकले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना कॅप्टन्स इनिंग्स खेळून १३० चेंडूंत २० चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १६० धावा चोपल्या. मुंबईने ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना चंडिगढचा संपूर्ण संघ ४९.५ षटकांत २८२ धावांत तंबूत परतला. देवांग कौशिकने १०० चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८५ धावा केल्या. कर्णधार पारसनेही ६० चेंडूंत ५३ धावांची खेळी केली. आर्यन वर्मा ( ३४), इशान गाबा ( ४५) यांच्या उपयुक्त खेळीनंतर तळाला निशुंक बिर्लाने ३२ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून आयुष वर्तकने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मुशीरने २, तर मोहम्मद सैफ, प्रेम, उमार खान व यासीन शेख यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.