भारतीय संघाचा माजी कसोटीपटू विनोद कांबळी याने वानखेडे स्टेडियमवरील सुवर्ण महोत्सवी सोहळ्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून हा क्रिकेटर आरोग्यासंबंधित वेगवेगळ्या समस्येचा सामना करत असल्यामुळे चर्चेत होता. ठाण्यातील रुग्णालयातील उपचारानंतर तो आता बऱ्यापैकी रिकव्हर झालाय. पण अजूनही चालताना त्याला आधाराची गरज भासते. या परिस्थितीत त्याची पत्नी आणि माजी मॉडेल अँड्रिया हेविट त्याच्या पाठीशी खंबीर उभा आहे. वानखेडे स्टेडियमवररील कार्यक्रमात ते पाहायलाही मिळालं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! अन् पत्नी अँड्रिया झाली विनोद कांबळीची आधारस्तंभ! इथं पाहा व्हिडिओ
सेलिब्रिटी अपडेट्स देणाऱ्या Viralbhayani या इन्स्टाग्राम पेजवरुन विनोद कांबळी आणि त्याची पत्नी अँड्रिया हेविट यांच्या वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमातील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अँड्रिया पती आणि माजी क्रिकेटर विनोद कांबळीची सावली होऊन त्याची आधारस्तंभ झाल्याचे पाहायला मिळते. विनोद कांबळी भेटीगाठी दरम्यान काहींना आपल्या पत्नीची ओळख करून देतानाही यात दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कठीण प्रसंगात पत्नीची साथ...
काही दिवसांपूर्वी गुरुवर्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मरणार्थ शिवाजी पार्कवर उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात विनोद कांबळीचा व्हिडिओ समोर आला होता. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही जोडी बऱ्याच दिवसांनी एका व्यासपीठावर दिसली. ही दोघे एकत्र येतात त्यावेळी चर्चाही रंगतेच. पण यावेळी विनोद कांबळीला बिकट परिस्थितीत पाहून अनेकांना धक्का बसला. त्यानंतर काही दिवसांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळही आली. आता तो उपचारानंतर पुन्हा घरी परतला आहे. रुटीन चेकअपसाठी त्याला रुग्णालयातही जावे लागते. या सर्व कठीण काळात पत्नी माझ्यासाठी खूप काही करत असल्याचेही विनोद कांबळीनं वेळोवेळी बोलून दाखवलं. पण अँड्रिया तशी थेट पिक्चरमध्ये दिसली नव्हती.
विनोद कांबळीच्या बर्थडे दिवशीही दिसली होती पत्नीची झलक
मागील काही दिवसांपासून विनोद कांबळी सातत्याने चर्चेत आहे. त्याने ज्या ज्या वेळी मनातील भावना व्यक्त केली त्या त्या वेळी त्याने पत्नी अँड्रिया काळजी घेत असल्याची गोष्ट आवर्जून सांगितली. कांबळीनं १८ जानेवारीला बर्थडे साजरा केला त्यावेळी अँड्रियाची झलक पाहायला मिळाली. तिने आपल्या दोन मुलांसह आणि रुग्णालयातील स्टाफ सदस्यांसोबत कांबळीचा बर्थडे साजरा केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता तिचा वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रमातील व्हिडिओ चर्चेत आला आहे.